हरिश्चंद्र गड: हरिश्चंद्र गडावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या प्रसिद्ध गिर्यारोहक अरुण सावंत यांचा दरीत पडून मृत्यू झाला आहे. रॅपलिंग करताना त्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. ६० वर्षांचे सावंत हरिश्चंद्रगडावरील कोकण कड्यावरून पडले. कोकणकड्यावरील माकडनाळ भागात शनिवारी सायंकाळी ही दुर्घटना घडली. त्यानंतर स्थानिकांच्या मदतीनं त्यांचा शोध सुरू करण्यात आला. आज त्यांचा मृतदेह बचाव पथकाला सापडला. अरूण सावंत हे ३० जण यांच्यासह हरिश्चंद्रगडावर रॅपलिंगसाठी आले होते.
माकडनाळ भागात सावंत यांच्यासोबत तिघेजण होते. त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. समोर आलेल्या माहितीनुसार, अरूण सावंत आणि इतर ३० जणांचा ग्रुप रॅपलिंगसाठी हरिश्चंद्र गडावर आले होते.
ते या मोहिमेचे नेतृत्व करत होते. कोकण कडा ते माकडनाळ इथं ते रॅपलिंग करणार होते. यातील पहिला टप्पा पूर्ण करून त्यांच्यासोबतचे सर्वजण खाली उतरले. सावंत हे दोराच्या साह्यानं रॅपलिंग करत असताना, बेपत्ता झाले. तेव्हापासून त्यांच्याशी संपर्क झाला नव्हता. स्थानिक आणि इतर ट्रेकर्सच्या मदतीनं शोध घेण्यात येत होता. आज अखेर त्यांचा मृतदेह सापडला.
ज्या ठिकाणी सावंत रॅपलिंगसाठी गेले होते तो कोकणकडा जवळपास अठराशे फूट उंच आहे. तर सावंत ज्या माकडनाळ भागातून दरीत पडले ते ठिकाण एक हजार फूट उंचावर आहे. ट्रेकर्सचं मार्गदर्शन करणारे अरूण सावंत यांचा मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त केली जात आहे. सावंत हे ट्रेकिंग क्षेत्रातलं मोठं नाव होतं.