मेखळी परिसरात वादळी वाऱ्यामुळे झाडे जमीनदोस्त

बारामती, दि. ४ मे २०२० : बारामती तालुक्यातील मेखळी गावसह परिसरात रविवारी रात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही भागात गारपीट झाली. यामध्ये चारा पिकासह इतर पिकांचे नुकसान झाल्याने परिसराला चांगलाच फटका बसला आहे. याबाबत झालेल्या नुकसानाची शेतकऱ्यांना भरपाई मिळावी, म्हणून पाठपुरावा करणार असल्याचे पुणे जिल्हा युवकचे सरचिटणीस ऋषी देवकाते यांनी सांगितले.

रविवारी(दि.३) रोजी रात्री ९ च्या सुमारास वादळी वाऱ्याने परिसरास झोडपले. मेखळी, सोनगाव, घाडगेवाडी, निरावागज या भागाला अवकाळीने झोडपले. यामध्ये सोनगाव येथे गारपीट झाली. शेतातील मका, कडवळ, गहू, यांसह चारा पिकांचे नुकसान झाले आहे.

मेखळी परिसरातील ऊसतोडणी कामगारांच्या झोपड्यांचेही नुकसान झाले आहे. मोठया प्रमाणात वाहणाऱ्या वादळी वाऱ्यामुळे बऱ्याच ठिकाणी झाडे मुळासकट उपटून जमीनदोस्त झाली आहेत. वाहणाऱ्या वाऱ्यामुळे विजेच्या तारा तुटल्याने परिसरातील वीजपुरवठा १४ ते १५ तास खंडित झाला होता. तापमानात कमालीची वाढ झाल्याने उकाड्याने नागरिकांचे हाल होत होते.
काही दिवसांपासून जगावर कोरोनाचे संकट ओढवले आहे. या संकटाने सर्वांचे व्यवहार व कामे बंद पडली आहेत. यातच भर म्हणून की काय, रविवारी अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आणि होत्याचे न्हवते झाले.अशा वारंवार येणाऱ्या नैसर्गिक संकटांमुळे शेतकऱ्यांची कर्जाच्या बोजातून सुटका होईल का ?असा सूर शेतकरी वर्गातून उमटत आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा