ट्रिपल इंजिन सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गंभीर नाही, नाना पटोले यांची टीका

मुंबई, १९ जुलै २०२३ : सध्या विधिमंडळाचं अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनाचा तिसरा दिवस विविध मुद्द्यांवरून गाजत आहे. अशात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतलीय. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना विरोधक प्रश्न विचारत आहेत. त्यावर हवा तो प्रश्न विचारा मी उत्तर देतो, असं धनंजय मुंडे म्हणाले.

विधानसभेतील चर्चेत भाग घेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ट्रिपल इंजिन सरकारवर तोफ डागली. राज्यातील भाजपाप्रणित ट्रिपल इंजिन सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गंभीर नाही. सरकार कर्ज वाटप आणि बियाणांसंदर्भात चुकीची माहिती देत आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने निर्देश जारी केल्याने अनेक सहकारी बँकांनी कर्ज वाटपच केले नाही, राष्ट्रीयीकृत बँका तर शेतकऱ्यांना दारातही उभे करत नाहीत आणि सरकार सांगत आहे कर्जवाटप झाले म्हणून. हे सरकार चुकीचे उत्तर देत असून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रकार आहे, असा संताप प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला.

पुढे ते म्हणाले की, बियाणे व खतांच्या किंमती वाढल्याने शेतकरी संकटात आहे का? बँका कर्ज देत नसल्याने शेतकऱ्यांना सावकाराकडे जावे लागते का? असे प्रश्न विचारण्यात आले असता, हे खरे नाही, असे धादांत खोटे व चुकीचे उत्तर सरकारकडून देण्यात आले आहे. अनेक सहकारी बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज वाटप केलेले नाही. बियाणे खतांच्या किमती वाढलेल्या आहेत, बोगस बियाणांचा सुळसुळाट आहे. मंत्र्यांच्या नावाने धाडी टाकून व्यापाऱ्याकडून वसुली करण्यात आली, त्यावर सरकारने काय कारवाई केली, असे प्रश्न पटोले यांनी उपस्थित केले.

यावर धनंजय मुंडे यांनी उत्तर दिले की, खतांचे भाव वाढलेले नाहीत. ते स्थिर आहेत. केंद्र सरकारने खतांच्या किमती वाढवलेल्या नाहीत. २०२१ मध्ये २० हजार २१७ कोटी रुपयांचं कर्ज वाटप झालं. २०२२ मध्ये २४ हजार ९५९ कोटी रुपयांचं कर्ज वाटप झालं. यंदाचा खरीप हंगाम अद्याप संपलेला नाही. ३१ जुलैपर्यंत हे कर्ज मिळणार आहे. २८ हजार २२६ कोटी रुपयांचं कर्जवाटप झालेलं आहे. मागच्या दोन वर्षापेक्षा या वर्षी जास्तीचं कर्ज वाटप झालेलं आहे. राज्यातील ४९ टक्के शेतकऱ्यांना खरीपाचं कर्ज वाटप करण्यात आलं आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विरोधकांनाी सभात्याग केला यावर धनंजय मुंडे यांनी घणाघात केला की, विरोधक शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्यपूर्वक बघत नाहीत. त्यामुळे त्यांच्या प्रश्नांची उत्तर दिलेली असताना ते सभात्याग करतात.

न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा