हवामान प्रदूषणास भारत कारणीभूत, राजकीय चर्चेत ट्रम्प यांनी केला भारतावर आरोप

वॉशिंग्टन, २३ ऑक्टोबर २०२०: अमेरिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. अध्यक्षपदासाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी अध्यक्षीय पदाच्या चर्चेदरम्यान हवामान बदलाविरूद्धच्या लढाईत भारताच्या प्रयत्नांवर प्रश्न उपस्थित केले. ट्रम्प म्हणाले की, हवामान बदलांच्या विरोधातील लढाईत भारत, चीन आणि रशिया यांचे फारसे प्रयत्न दिसत नाहीत. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्या टिप्पणीवरुन भारतातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

ट्रम्प यांच्या टीकेला दुर्दैवी म्हणत विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवरही निशाणा साधला आहे. ट्रम्प यांचे वक्तव्य दुर्दैवी असल्याचे ठाकरे सरकार मधील राज्यसभेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी ट्विट केले आहे. त्यांनी हवामान बदलाविरूद्धच्या लढाईतील भारताने दिलेल्या योगदानाची आठवण करुन दिली आणि म्हणाल्या की, हवामान बदलाशी संबंधित उद्दीष्टे साध्य करण्यासाठी भारत वचनबद्ध आहे.

त्याचवेळी ट्रम्प यांच्या अनेक विधानांचा संदर्भ देत काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी केंद्रावर निशाणा साधला. त्यांनी ट्विट केले आहे की, ट्रम्प यांनी भारतात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूबद्दल प्रश्न उपस्थित केले. ट्रम्प म्हणाले की, भारत हवा दूषित करत आहे. इतकेच नाही तर ट्रम्प यांनी भारताला टॅरिफ किंग म्हटले. सिब्बल यांनी टोमणा मारत असे म्हटले की, हा ‘हौडी मोदी’ चा परिणाम आहे.

काँग्रेस नेते रणदीपसिंग सुरजेवाला यांनीही ट्रम्प यांचे विधान चुकीचे असल्याचे म्हटले आणि ते म्हणाले की विकसनशील देश स्वच्छ हवेसाठी प्रयत्नशील आहेत. विशेष म्हणजे जो बिडेन यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान ट्रम्प यांनी हवामान बदलांविरूद्धच्या लढाईत चीन आणि रशिया यांच्यासह भारताच्या प्रयत्नांवरही प्रश्नचिन्ह ठेवले.


न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा