वॉशिंग्टन, १९ जून २०२१: अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी म्हटलं की कोरोना विषाणूच्या साथीनं भारत उद्ध्वस्त झालाय. जगभरात कोरोना विषाणूचा प्रसार करण्यास कारणीभूत असल्याबद्दल चीननं अमेरिकेला १० ट्रिलियन अमेरिकी डॉलर द्यावे, असंही ट्रम्प म्हणाले.
फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प म्हणाले की, चीननं जगाला मोठ्या प्रमाणावर नुकसान पोहोचवलंय. पूर्ण जगाच्या झालेल्या नुकसाना बद्दल चीननं नुकसान भरपाई देखील तेवढ्याच मोठ्या प्रमाणावर दिली पाहिजे. पण प्रश्न असा उपस्थित होतो की चीन एवढ्या मोठ्या प्रमाणावर नुकसान भरपाई देऊ शकंल का?
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, चीननं संपूर्ण जगाची भरपाई करावी. आता हे बघण्यासारखं आहे की चीन ही भरपाई कशाप्रकारे करतो. कारण नुकसान देखील तेवढं मोठं आहे. जगातील बर्याच देशांमध्ये कोरोनानं मोठ्या प्रमाणावर नुकसान केलंय. ट्रम्प यांनी कोरोनाला चिनी आणि वुहान व्हायरस म्हटलंय. माजी राष्ट्रपती म्हणाले की कोविड -१९ मुळं अमेरिकेचं मोठं नुकसान झालंय.
कोरोना विषाणूच्या प्रसारासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात ट्रम्प म्हणाले की, ‘मला पूर्ण विश्वास आहे की हा अपघात झाला होता. मी याविषयी ठामपणे सांगू शकतो की, अकार्यक्षमता आणि प्रयोगशाळेतील अपघातामुळं हा व्हायरस सर्व जगभर पसरला. भारताचा उल्लेख करताना ट्रम्प म्हणाले की यापूर्वी तिथं कोणत्याही आजारामुळं इतके मृत्यू झाले नव्हते. सध्या भारतात काय घडत आहे ते आपण पाहू शकता. ते किती चांगलं काम करतात हे सांगण्याची सवय भारतातील लोकांना आहे. पण वास्तवात देशामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. खरं तर, प्राणघातक कोरोना संसर्गामुळं प्रत्येक देश उद्ध्वस्त झाला आहे. आता चीननं या सर्व देशांना मदत केली पाहिजे.
जगभरातील कोरोना संक्रमणाबद्दल डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, जरी ते अपघातानं झालं असले तरी आपण या देशांकडं पहात आहात. आता ते पूर्वीसारखे कधीच होणार नाहीत. आपल्या देशावरही वाईट परिणाम झाला आहे. पण इतर देशांवर याचा परिणाम त्याहीपेक्षा जास्त झालाय. ते म्हणाले की, मला वाटतं की सर्वात महत्वाचं हे आहे की हा विषाणू आला कुठून आणि निर्माण कसा झाला हे शोधणं.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे