बीड, दि.२७ मे २०२० : हाताला काम हवे असेल तर मजूरांनी आपापल्या ग्रामपंचायतशी थेट संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे. याबाबत त्यांनी एक पत्रकच काढले आहे.
या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, सद्यस्थितीत साखर कारखाने बंद झाल्यामुळे व कोविड १९ या साथी रोगाच्या पार्श्वभूतीवर इतर राज्य व परजिल्ह्यातून बीड जिल्ह्यातील मूळ गावी अनेक मजूरांचे स्थलांतर झालेले आहे. जिल्ह्यातील मूळगावी परतलेल्या कामगारांना, मजुरांना त्यांचे गावातच रोजगार उपलब्ध करुन देणे ही ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे.
त्याअनुषंगाने सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक यांनी आपल्या रोजगार सेवकांमार्फत सर्वेक्षण करुन घ्यावे. कामाची मागणी असणार्या प्रत्येक मजुराचे नमुना नंबर १ अर्ज भरुन घेऊन कुटुंबनिहाय जॉबकार्ड तयार करुन घ्यावेत व त्यांच्या मागणीनुसार गावाच्या हद्दीतच काम उपलब्ध करुन घ्यावे.
मनरेगा अंतर्गत यापूर्वी दिलेल्या सर्व सूचना व वेळोवेळी निघालेले शासन निर्णय व मार्गदर्शक सूचना यांचे पालन करुन सर्व मजुरांना काम पुरविण्यात यावे व वेळेवर मजुरी मिळण्याचे दृष्टीने सर्व प्रक्रिया विहीत मुदतीत पार पाडावी. याद्वारे गावस्तरावरील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, ज्यांना रोजगाराची आवश्यकता आहे, त्यांनी तात्काळ आपल्या ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवक यांच्याशी संपर्क साधावा याकामी काही अडचण असल्यास आपल्या पंचायत समिती (नरेगा कक्ष) अथवा जिल्हा परिषद (नरेगा कक्ष) यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्य अधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: