नवी दिल्ली, ४ जानेवारी २०२१: गेल्या महिन्यात अधिक काळापासून शेतकरी दिल्लीत आंदोलन करत आहे. सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे हे आंदोलन सुरू आहे. दरम्यानच्या काळात शेतकऱ्यांना प्रचंड थंडीचा सामना करावा लागला. या वर्षातील सर्वात न्यूनतम तापमान देखील या काळात दिल्लीमध्ये नोंदवले गेले. थंडीमुळे याआधी अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू देखील झाला आहे. त्यातच आता काल पावसाने देखील हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांवर दुहेरी संकट उभे राहिले आहे. मागच्या चोवीस तासात टिकरी आणि कुंडली सीमेवर आंदोलन करत असलेल्या दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे.
मृतक शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांनी असे म्हटले आहे की, थंडीमुळे या शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. पण, याला जबाबदार सरकार आहे. कारण, सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना हे आंदोलन करावे लागत आहे. यातील पहिल्या शेतकऱ्याचा मृत्यू टिकरी सीमेवर झाला आहे. याठिकाणी मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव जुगबीर सिंह असे आहे. कुंडलीच्या सीमेवर दुसर्या शेतकर्याचा मृत्यू झाला आहे, तर त्याचे नाव कुलबीर सिंह असे आहे.
या वृत्तानुसार, ६५ वर्षीय शेतकरी जुगबीरसिंग यांचे रविवारी पहाटे टिकरी सीमेवर हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. जुगबीरसिंग हे जिंदच्या इटल कलान गावाचे रहिवासी होते. ते बऱ्याच काळापासून या आंदोलनामध्ये सहभागी होते.
त्याचवेळी सोनीपतच्या गंगना गावात राहणारे कुलबीर सिंग यांचेही काल निधन झाले. कुलबीर ४५ वर्षाचे होते. ते सुरुवातीपासूनच या चळवळीत सामील होते. रविवारी थंडीमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी सिव्हील रुग्णालयात पाठविला. त्याचवेळी पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. कुटुंबातील सदस्यांनी आर्थिक मदतीची मागणी केली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे