भुवनेश्वर,ओडिशा २६ जून २०२३: ओडिशामध्ये रविवारी रात्री उशिरा झालेल्या भीषण बस अपघातात १० जणांचा मृत्यू झाला असून ८ जण जखमी झाले. ही घटना गंजाम जिल्ह्यातील आहे, जिथे प्रवाशांनी भरलेली ओडिशा रोडवेजची बस आणि खाजगी बसची समोरासमोर धडक झाली. या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाल्याचेही सांगण्यात येत असून, त्यांना उपचारासाठी बेरहामपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेबाबत बेरहामपूरचे एसपी सरवन विवेक यांनी माडियाशी बोलताना सांगितले की, रविवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात खासगी बसमधील अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमीही झाले आहेत. त्याचवेळी ओडिशा रोडवेज बसमधील लोकांना किरकोळ दुखापत झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ओडिशा रोडवेजची बस रायगडाहून भुवनेश्वरला जात होती, तर खासगी बस बेरहामपूरहून सामान घेऊन परतत होती. या घटनेनंतर बसमध्ये अनेक प्रवासी अडकले होते, त्यांना पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले. मात्र, दोन्ही बसची समोरासमोर धडक होण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
या घटनेबाबत, ओडिशा सरकारने जखमींना उपचारासाठी तीन लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे. त्याचवेळी या दुर्घटनेवर शोक व्यक्त करत मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी तीन लाख रुपयांची मदत जाहीर केली. या दुर्घटनेत अनेक प्रवासी गंभीर जखमी झाल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जातेय.
न्यूज अनकट प्रतिनिधी- सूरज गायकवाड