परभणी, २८ ऑक्टोबर २०२०: परभणी लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार बंडू उर्फ संजय जाधव यांनी जीवाला धोका असल्याची तक्रार दाखल केली आहे. संजय जाधव यांना जीवे मारण्यासाठी दोन कोटींची सुपारी देण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. शिवसेनेचे नेते संजय जाधव यांनी अशी तक्रार पोलिसांकडे केली आहे. पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, १८ ऑक्टोबर रोजी त्यांना माहिती मिळाली की एका प्रभावशाली व्यक्तीने संजय जाधव यांना ठार मारण्यासाठी नांदेडच्या एका टोळीला २ कोटीची सुपारी दिली होती.
खासदार संजय जाधव यांनी याप्रकरणी नानलपेठ पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली आहे. एवढेच नव्हे तर त्यांच्या ठार मारण्याबाबत देण्यात आलेल्या सुपारीची बाब त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानावर देखील घातली असल्याचे सांगितले आहे. सध्या या प्रकरणी नानलपेठ पोलीस तपास करत आहेत.
मला मारण्यासाठी परभणीतून दोन कोटी रुपयांची सुपारी देण्यात आली आहे. नांदेडमधील एका मोठ्या टोळीने हा कट रचल्याची शक्यता खासदार संजय जाधव यांनी तक्रार अर्जात केली आहे. याप्रकरणी रात्री उशिरा त्यांनी तक्रार दाखल केली आहे.
“मला जीवे मारण्याची सुपारी देणारा व्यक्ती हा परभणीतील असावा” असा आरोप खासदार संजय जाधव यांनी केला आहे. माझ्या एका विश्वासू व्यक्तीने मला ही माहिती दिली आहे, असेही संजय जाधव यांनी पोलिसात तक्रार करताना सांगितले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे