मंचर, ३ ऑक्टोंबर २०२०: मंचर- आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असणाऱ्या दोन लाचखोर पोलीस कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने २० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाबळे आणि भुजबळ मंचर पोलीस स्टेशन मध्ये नेमणुकीस आहेत. यातील तक्रारदाराला क्रिकेट बेटिंग चालवतो म्हणून त्याला ३० सप्टेंबरला पकडण्यात आले होते. त्यावेळी या दोघांनी त्याच्याकडून ५० हजार रुपये घेतले होते. त्यानंतर देखील बेटिंग सुरू ठेवण्यासाठी त्याच्याकडे दोघांनी १ ऑक्टोबरला ५० हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यामुळे तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
शुक्रवारी सायंकाळी या दोघांना पकडले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक सुनिल बिले यांनी दिली. क्रिकेट बेटिंग वरून यांनी लाच घेतली असून प्रशांत सुरेश भुजबळ (वय ३० ) आणि कृष्णदेव सुभाष पाबळे (वय ३२)अशी ताब्यात घेण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. या दोघांवर मंचर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला व अखेर २ ऑक्टोबरला वीस हजार रुपयांची लाच घेताना पाबळे आणि भुजबळ दोघांनाही रंगेहात पकडले आहे.
न्यूज अनकट प्रतिनीधी : साईदिप ढोबळे