नवी दिल्ली, १ जानेवारी २०२३ :नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी नवी दिल्लीत मोठी दुर्घटना घडली आहे. येथील एका नर्सिंग होमला आज सकाळीच भीषण आग लागली. ही आग अत्यंत भीषण होती की, त्यामुळे एकच हाहाकार माजला. या आगीत दोघांचा होरपळून मृत्यू झाला आहे. आधी भूकंपाचे धक्के आणि आता आग लागल्याने दिल्लीकरांमध्ये भीतीचं वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे सव्वा पाच वाजता ग्रेटर कैलाश-२ मधील सीनियर सिटीजन केअर होम या नर्सिंग होमला ही आग लागली. सुरुवातीला कुणाला काहीच कळले नाही. मात्र, जसजशी आग तीव्र होत गेली आणि गरम वाफा येऊ लागल्याने रुग्णालयात एकच खळबळ उडाली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली. दरम्यान, या आगीत दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर अग्निशमन दलाने सहा जणांची सुटका केली आहे. तासा दीडतासाच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले आहे.
यापूर्वी १७ डिसेंबरच्या सकाळी दिल्लीतील ग्रेटर कैलास पार्ट- १ येथील फिनिक्स रुग्णालयामध्ये आग लागली होती. रुग्णालयाच्या तळघरात आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या, त्यांनी आग आटोक्यात आणली. अग्निशमन विभागाला सकाळी ९.३० वाजता आग लागल्याची माहिती देण्यात आली होती.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.