दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत एक आतंकी कमांडरसह दोन दहशतवादी ठार

जम्मू काश्मीर, २५ सप्टेंबर २०२०: दक्षिण काश्मीरच्या जिल्हा अनंतनागमधील बिजबेहरा उपविभागातील सिरहमा गावात रविवारी सायंकाळपासून सुरक्षा दले आणि अतिरेक्यांच्या दरम्यान सुरू असलेल्या चकमकीत आतापर्यंत लष्कर-ए-तैयबाचे दोन अतिरेकी ठार झाले आहेत. पोलिस सूत्रांचं म्हणणं आहे की, मारला गेलेला आतंकवादी हा संघटनेतील टॉप कमांडर पदावर होता. गेल्या तीन वर्षांपासून तो खोऱ्यात लपून बसला होता. सध्या पोलिसांनी ठार झालेल्या कोणत्याही आतंकवाद्यांची नावं किंवा ओळख जाहीर केलेली नाही. हा परिसर रिकामा केल्यानंतर ठार झालेल्या दहशतवाद्यांचे मृतदेह सुरक्षा दलानं ताब्यात घेतले आहेत. चकमकीच्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात शस्त्र व दारूगोळा जप्त करण्यात आलाय. जमाव रागाच्या भरात धावत असताना चकमकीनंतर झालेल्या स्फोटात दोन नागरिकही जखमी झाले आहेत.

पोलिसांनी सांगितलं की, गुरुवारी संध्याकाळी विश्वासार्ह स्त्रोतांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, पोलिस, लष्कराच्या ३ आरआर आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकानं या भागात शोध मोहीम राबविली. सिरहमा गावाला घेराव घालून सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा शोध सुरू केला. सुरक्षा दलांना जवळ येताना पाहून दहशतवाद्यांनी गोळीबार केला. दहशतवाद्यांना प्रति उत्तर देण्यापूर्वी सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना शरण येण्याची संधी दिली. पण, त्यानंतरही त्यांनी गोळीबार सुरू ठेवल्यानंतर सुरक्षा दलानं गोळीबार केला.

अंधाराचा फायदा घेत सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना पळ काढण्याची संधी मिळू नये म्हणून बंदोबस्तही ठेवला होता. शुक्रवारी पहाटेपर्यंत गोळीबार सुरू होता. सुरक्षा दलांनी सकाळी नऊ ते दहा दरम्यान लपलेल्या दोन्ही दहशतवाद्यांना ठार केलं. ठार झालेल्या दहशतवाद्यांपैकी एक परदेशी आणि दुसरा पुलवामाचा रहिवासी आहे. दोघेही लष्कर-ए-तैयबाशी संबंधित असल्याचं सांगितलं जातंय. दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाल्यानंतर, जेव्हा स्थानिक लोक घराची झालेली मोडतोड बघण्यासाठी तेथे पोहोचले, त्याच दरम्यान अतिरेक्यांनी लावलेल्या ग्रेनेडमध्ये स्फोट झाला आणि दोन स्थानिक जखमी झाले. दोन्ही स्थानिक नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

दुसरीकडं सुरक्षा दलानं परिसरात शोधमोहीम राबविली आणि तेथे आणखी अतिरेकी उपस्थित नसल्याची पुष्टी केली. खात्री पटल्यानंतर सर्व सैनिक ऑपरेशन संपवून परत आले आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा