जम्मू-काश्मीर, १ ऑगस्ट २०२१: जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथील नागबेरन-तरसरच्या जंगलात सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. पोलिसांनी सांगितले की, ठार झालेल्या दहशतवाद्यांपैकी एक जैश-ए-मोहम्मद दहशतवादी लंबू आहे जो पाकिस्तानचा सर्वात मोठा दहशतवादी होता. लंबू सुधारित विस्फोटक यंत्र (IED) बनवण्यात निष्णात होता आणि २०१९ मध्ये पुलवामा हल्ल्याच्या कटातही सामील होता. सुरक्षा दल ४ वर्षांपासून त्याचा शोध घेत होते. २०१७ पासून तो खोऱ्यात सक्रिय होता.
काश्मीर पोलिसांचे आयजी विजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद इस्माईल अल्वी उर्फ लंबू उर्फ अदनान हा जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहरचा नातेवाईक होता. १४ फेब्रुवारी २०१९ रोजी पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याच्या दिवसापर्यंत तो फियादीन आदिल दार याच्यासोबत राहिला. आदिलच्या व्हायरल व्हिडिओमध्ये लंबूचा आवाजही ऐकू आला. पुलवामा हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले.
नागबेरन-तरसरच्या जंगलात काही दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर शोध सुरू करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. यावेळी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा ५ दहशतवाद्यांचा गट होता. यामध्ये एक स्थानिक आणि चार पाकिस्तानी दहशतवादी होते. चकमकीत ठार झालेल्या दुसऱ्या दहशतवाद्याची ओळख अद्याप पटलेली नाही. त्याचबरोबर संपूर्ण परिसरात शोधमोहीमही सुरू आहे, ज्यात तीन जिल्ह्यांचे पोलीस आणि लष्कराचे जवान गुंतले आहेत.
पुलवामा हल्ल्यात ३५० किलो आयईडीचा वापर
१४ फेब्रुवारी २०१९ रोजी जम्मू -काश्मीरमधील पुलवामाच्या अवंतीपोरा भागात सीआरपीएफच्या ताफ्यावर फिदाईन हल्ला झाला. गोरीपुरा गावाजवळ झालेल्या या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी ३५० किलो आयईडीचा वापर केला.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे