मुंबई, ९ नोव्हेंबर २०२०: लॉकडाउनच्या काळामध्ये मुंबईकरांना वाढीव वीज बिलं मिळाली होती. यावर नागरिकांनी अनेकदा संताप देखील व्यक्त केला होता तर विरोधी पक्षांनी देखील आंदोलनं केली होती. ही वाढीव बिलं भरण्यासाठी नागरिक टाळाटाळ करत आहे. या पार्श्वभूमीवर वीज ग्राहकांना मदत करण्यासाठी तसेच वीज बिल भरण्यास प्रोत्साहित करण्यासाठी बेस्टने ग्राहकांना बिलात दोन टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला आहे.
बेस्टने दिलेल्या माहितीनुसार, ज्या वीजग्राहकाने नोव्हेंबर महिन्याचे वीजबिल तात्काळ भरले, त्याला एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरमधील वीज वापरावरील प्रदान आकार आणि वीज बिलाच्या थकबाकीवरील व्याज माफ करण्यात येईल. तर एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याच्या वीज वापराच्या बिलात २ टक्के सूट देण्यात येईल.
तर नोव्हेंबर महिन्यातील वीजबिल नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीमध्ये भरल्यास त्या ग्राहकाला एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरमधील वीज वापरावर विलंब शुल्क आणि व्याजात सूट दिली जाईल. या ग्राहकाला एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या वीज वापराच्या बिलावर १ टक्के सूट दिली जाईल.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे