तुळजापूर, २५ जून २०२० : अणदूर येथील गांजा प्रकरणातील एक वेगळीच घटना समोर आली आहे. एका अधिकाऱ्याने गांजा पकडला आणि दुसऱ्या अधिकाऱ्याने यावर गुन्हा दाखल केला; तर या प्रकरणातील मुख्य आरोपीला सोडून देण्यात आले होते.
पोलीस उपनिरीक्षक गणेश झिंजुर्डे पूर्वी तुळजापूर येथील पोलीस ठाण्यात कार्यरत होते. तेथून त्यांची बदली वाशी येथे झालेली असताना त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कोणतीही कल्पना न देता १७ जूनच्या मध्यरात्रीनंतर ते १८ जूनच्या पहाटे दरम्यान एका मोठ्या कार मधून नेण्यात येत असणारा गांजा पकडला होता. हा गांजा त्यांनी नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अणदूर येथे पकडला. या कारवाई दरम्यान कारमध्ये नोंदीला आलेल्या दोन आरोंपीसह अन्य एक महिला अारोपीही असल्याचे समजते. परंतु, त्या महिलेला या प्रकरणात नोंदीला न घेता सोडून दिले आणि इतर दोघांना अटक दाखवून नळदुर्ग पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हाही नोंदविण्यात आला.
धक्कादायक गोष्ट म्हणजे ही कारवाई झिंगुर्डे यांनी तुळजापूर येथील उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या कार्यालयात संलग्न असलेल्या पोलिस नाईक रवी राऊत याच्या सहकार्याने केली असताना प्रत्यक्षात मात्र पोलिस दप्तरी ही कारवाई उपविभागीय अधिकारी टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली नळदुर्गचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राऊत, तुळजापूरच्या उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाचे वाचक- सपोनि रोडगे, नायब तहसीलदार भारती आदींनी केल्याचे नोंदविण्यात आले. परंतु, प्रत्यक्षात कारवाई झिंगुर्डे यांनी केल्याचे समोर येत असल्याने या इतर अधिकाऱ्यांचा यामध्ये काय सहभाग असा ही प्रश्न उपस्थित होत आहे.
या प्रकरणाबाबत माध्यामात बातम्या आल्यानंतर वरिष्ठ पातळीवरून चौकशी करण्यात आली. तसेच प्राथमिक चौकशी दरम्यान ही कारवाई झिंजुर्डे यांनी केल्याचे समोर आले. या प्रकरणात जप्त करण्यात आलेले वाहन एम. एच. २५ एएल ९१९९ हे मीना पाटील या महिलेच्या नावावर असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच या कारमध्ये ती देखील उपस्थित असल्याचे व तीला सोडून दिल्याचे समोर येत आहे. या प्रकरणात इतर २ आरोपींना अटक केली असली तरी मुख्य आरोपी असणाऱ्या मीना पाटील यांना आर्थिक देवाणघेवाण करून सोडून देण्यात आले होते, तरी पोलीस तीचा शोध घेत आहेत. मीना पाटील या एका राजकीय पक्षाच्या माजी जिल्हाध्यक्ष असून गतवर्षी त्या तळेगाव (पुणे) येथे एका मोठ्या कापड दुकानातून साड्या चोरताना सापडल्या होत्या . या गांजा प्रकरणात आता त्यांना अटक होण्याची शक्यता आहे.
संबंधित गांजा प्रकरणात पोलीस अधीक्षक राज तिलक रोशन यांनी पोलीस उपनिरीक्षक गणेश झिंजुर्डे तसेच पोलीस नाईक रवी राऊत यांना दिनांक २३ जून ला निलंबित केले आहे. मात्र, या कटात सहभागी झाल्याबद्दल कोणती कारवाई होणारआहे ? याकडे लक्ष वेधले आहे. तसेच मीना पाटीलचा शोध सुरूच आहे.
न्यूजअनकट प्रतिनिधी: प्रगती कराड