बारामती, ४ सप्टेंबर २०२३ : बारामती तालुक्यातील जळगाव कडेपठार येथे भरधाव वेगातील चारचाकीने दहावीत शिकत असलेल्या तीन शाळकरी मुलांना आज सकाळी नऊच्या सुमारास धडक दिली आहे. या अपघातात ओंकार संतोष खांडेकर व रुपेश अमोल खांडेकर ही दोन शाळकरी मुले मृत्यूमुखी झाले आहेत. या अपघातात संस्कार संतोष खांडेकर हा देखील गंभीर जखमी झाला आहे. संस्कार हा पाचवीमध्ये शिकत आहे.
आज सकाळी नेहमीप्रमाणे घरुन शाळेमध्ये जाण्यासाठी हे तिन्ही शाळकरी मुले निघाली होती. जळगाव कडेपठार गावांमध्ये पुणे बारामती रस्त्यावर मोरगाव कडून बारामतीकडे निघालेल्या चारचाकीने, शाळेकडे निघालेल्या तिन्ही शाळकरी मुलांना जोरदार धडक दिली. यानंतर मोर्चाच्या पोलीस बंदोबस्तावर असलेल्या प्रविण वायसे, राहुल पांढरे, विजय वाघमोडे व अमोल राऊत या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांच्याच खाजगी गाडीतून बारामतीतील गावडे हाॅस्पिटलमध्ये तिन्ही मुलांना नेले, मात्र त्यापैकी दोन मुलांचा मृत्यू झाला होता. तर संस्कार यास गिरीराज रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
या तिन्ही मुलांना या गाडीने मागून धडक दिली व त्यानंतर रस्त्याच्या कडेला असलेल्या एका वाहनाला ही गाडी जाऊन धडकली. हा अपघात नेमका कशामुळे झाला यांचा पोलीस तपास करीत आहेत.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर