काबूल विमानतळाबाहेर दोन आत्मघाती हल्ले, १३ जणांचा मृत्यू, ५२ जखमी

काबूल, २७ ऑगस्ट २०२१: तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर देशाबाहेर पडण्यासाठी लाखो नागरिकांची धडपड सुरू असताना गुरुवारी काबूल विमानतळ स्फोटांनी हादरले. विमानतळाबाहेर दोन ठिकाणी आत्मघातकी हल्ले झाले आहेत. विमानतळाच्या गेटवर एक स्फोट झाला तर दुसरा हल्ला बेरान हॉटेलजवळ झाला. या हल्ल्यांमध्ये मुलांसह १३ लोकांचा मृत्यू झाला आहे तर सुमारे ५२ लोक जखमी झाले आहेत. आत्मघाती हल्ले झाले तेव्हा विमानतळावर आणि आसपास हजारो लोक उपस्थित होते.

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने सर्वप्रथम स्फोटांतील मृत आणि जखमींबाबत माहिती दिली. या स्फोटांत १२ अमेरिकी कर्मचारी ठार झाल्याचे अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तर वृत्तसंस्था रॉयटर्सनुसार, तालिबानच्या प्रवक्त्याने सांगितले की, काबूल विमानतळाबाहेर झालेल्या हल्ल्यात मुलांसह १३ जण मारले गेले.

अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे प्रवक्ते जॉन किर्बी म्हणाले, आबे गेटवर स्फोट झाल्याची मिळाली आहे. यामुळे अमेरिकन आणि इतर नागरिकांना जीवितहानी झाली आहे. यानंतर काही वेळात बेरन हॉटेलजवळ आणखी एक स्फोट झाल्याची पुष्टी झाली आहे. आबे गेट आणि बेरन हॉटेलमधील अंतर कमी आहे. कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. अमेरिकेच्या अधिकाऱ्याने मात्र काबूल विमानतळाबाहेर स्फोट इस्लामिक गटाने घडवून आणला असल्याचे निश्चितपणे मानले आहे.

अफगाणिस्तानातील आपापल्या देशांच्या नागरिकांना सुखरूप परत आणण्याची अनेक देशांची मोहीम काबूल विमानतळावर अंतिम टप्प्यात आहे. या बचाव मोहिमेदरम्यान अमेरिकेसह मित्रराष्ट्रांच्या सैन्यावर हल्ला न करण्याची ग्वाही तालिबानने दिली होती. अमेरिकेने जाहीर केल्यानुसार ३१ ऑगस्टपर्यंत सर्व परदेशी सैन्य माघारी गेले पाहिजे, अशी भूमिका तालिबानने घेतली आहे.

ब्रिटनच्या गुप्तचर यंत्रणेने या हल्ल्याबाबत इशरा दिला होता. ब्रिटनचे संरक्षण सचिव जेम्स हिप्पी म्हणाले होते की हा एक धोका आहे ज्याचे तपशील मी तुम्हाला देऊ शकत नाही, पण हा धोका अगदी जवळ असून अत्यंत घातक आहे.

गुप्तचर इनपुटमध्ये असे म्हटले जात होते की हा हल्ला इसिसकडून केला जाऊ शकतो. यापूर्वी तालिबानने पंजशीर वगळता संपूर्ण अफगाणिस्तान ताब्यात घेतला होता. तेव्हापासून हजारो लोकांनी अफगाणिस्तान सोडले आहे. तालिबानच्या राजवटीच्या भीतीने लोकांना ३१ ऑगस्टपूर्वी अफगाणिस्तान सोडायचे आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा