पुणे, दिनांक २४ सप्टेंबर २०२२: पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथे दुचाकीवरून चाललेल्या दांपत्याला ट्रॅक्टरचा धक्का बसून महिलेच्या हातातील बाळ ट्रॅक्टर खाली जाऊन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. एका आईसमोर अवघ्या सहा महिन्याच्या आपल्या बाळाचा ट्रॅक्टरच्या ट्रॉली खाली चिरडून मृत्यू झाला आहे. मन हेलावून टाकणारी सदर घटना ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. या घटनेमुळे परिसरात एकच संताप उसळला.
मृत चिमुकला हा आजारी होता. त्यामुळे त्याचे आई-वडील त्याला डॉक्टरांकडे घेऊन निघाले होते. परंतु दुर्देवाने रस्त्यात अपघात घडला आणि होत्याचे नव्हते झाले. बालकाला रुग्णालयात घेवून जात असताना मागून येणाऱ्या ट्रॅक्टरने काळाचा घाला घातला. पाठीमागून आलेला ट्रॅक्टर पुढे जात असताना ट्रॉलीचा धक्का बसला आणि आईच्या हातून बाळ खाली पडले. आणि ते बाळ थेट ट्रॉलीच्या चाकाच्या खाली सापडले, ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचे चाक त्याच्या अंगावरून गेले होते.
घटना एवढी वेगात घडली की आजूबाजूच्या कोणाच्याही काही लक्षात आले नाही. बाळाच्या अंगावरुन ट्रॅक्टरची ट्रॉली पुढे निघून गेल्यावर आईने हंबरडा फोडून आपल्या लेकराला उचलून छातीशी कवटाळून घेतले. त्याला गोंजारून हलवण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान त्यांची गाडी रस्त्यावर खाली पडली होती. रस्त्यावर जाणारे येणारे नागरीक त्यांच्या जवळ गेले. त्यांनी दाम्पत्याला बाळासह रस्त्याच्या कडेला घेतले. बाळाला तातडीने रुग्णालयात घेऊन गेले. परंतु डॉक्टरांनी बाळाचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या दुर्घटनेनंतर ट्रॅक्टर चालकावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. आता पोलीस या घटने प्रकरणी नेमकी काय कारवाई करतात हे पहावे लागणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर