पुणे जिल्हा : सध्या लॉक डाऊन असल्यामुळे सर्वच जण घरात अडकलेले आहेत. अशा परिस्थितीमधे अनेक मजुरांच्या हाताला काम नाही त्यामुळे घरात अन्नाचीही चणचण. मात्र या लॉकडाऊनच्या काळातही सामाजिक भान असलेले बारामतीतील काही तरुण, बांधकाम मजुरांच्या मुलांसाठी विशेष मेहनत घेताना दिसत आहेत.
सध्या कोरोनामुळे बारामती शहरातही जनजीवन विस्कळीत झाले आहे. मागील पंधरा दिवसांमध्ये इथे ७ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे प्रशासनाने विशेष काळजी घेत लॉकडाऊन अधिक कडक केला आहे. एमआयडीसी व बांधकाम व्यवसाय बंद असल्यामुळे येथील अनेक परप्रांतीय मजूर बारामती शहरात अडकल्याने अडचणीत आले आहेत. या मजुरांना थेट तयार जेवण देण्याचे नियोजन प्रशासनाच्या वतीने सध्या करण्यात येत आहे. मात्र या मजुरांच्या चिमुकल्यांना दूध मिळण्यास अडचणी येत होत्या.
या मजूरांची लहानगी मुले दुधासाठी आपापसात भांडत असल्याचे दृष्य डेअरीमध्ये दूध घालण्यासाठी निघालेल्या एका तरुणाला दिसले. त्यामुळे व्यथित झालेल्या या तरुणाने माणुसकीच्या नात्याने या मुलांच्या रोजच्या दुधाची जबाबदारी घेतली. “तेजस्वी इनीशिएटिव्ह”च्या माध्यमातून, बारामतीमधील परप्रांतीय मजूर वस्तीतील सुमारे ३०० मुलांना दररोज घरोघरी जाऊन दूध पोहचवण्याचे काम हा तरुण आता करत आहे.
सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या “तेजस्वी इनीशिएटिव्ह” संस्थेतील कार्यकर्त्यांच्या व पदाधिकार्यांच्या ही गोष्ट लक्षात आली. त्यामुळे त्यांनी आता डेअरीला जाणारे दूध बंद करून, थेट मजुरांना दुधाची पॅकेट्स द्यायला सुरवात केली आहे. त्यामुळे या चिमुकल्यांचा दुधाचा प्रश्न सुटला आहे.
या माध्यमातून दररोज १०० लिटर दूध व इतर खाद्य पदार्थ या चिमुकल्यांना पुरवले जात आहेत. अशी माहिती ‘तेजस्वी इनिशिएटिव्हचे’ आनंद लोखंडे यांनी “न्युज अन कट”शी बोलताना दिली.
न्युज अनकट प्रतिनिधी: प्रशांत श्रीमंदिलकर