उद्धव ठाकरे आजपासून दोन दिवसीय विदर्भ दौऱ्यावर, आज घेणार पोहरादेवीचे दर्शन

8

मुंबई, ९ जुलै २०२३ : शिवसेना ठाकरे गटाचे नेते, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजपासून दोन दिवसीय विदर्भ दौऱ्यावर जाणार आहेत.पोहरादेवीचे दर्शन घेऊन ते आपल्या दौऱ्याला सुरुवात करणार आहेत.शिवसेनेत पडलेली फूट आणि राष्ट्रवादीत झालेली बंडाळी या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे हे मैदानात उतरणार आहेत. विदर्भातील यवतमाळमधून उद्धव ठाकरे यांचा दोन दिवसीय झंझावाती दौरा सुरू होणार आहे. यावेळी ते जनतेशी संवाद साधणार असून आपली भूमिका मांडणार आहे. यावेळी राज्यातील बदललेली राजकीय समीकरणे आणि शिंदे गटावर काय टीका करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उद्धव ठाकरे यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कालपासून महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे. शरद पवार यांनी काल नाशिकच्या येवला येथे सभा घेतली. छगन भुजबळ यांच्या मतदारसंघातच पवार यांनी पहिली सभा घेऊन भुजबळांना आव्हान दिले. शरद पवार यांच्या सभांचा धडाका सुरू झालेला असतानाच आता उद्धव ठाकरेही सभांचा धडाका लावणार आहे. उद्धव ठाकरे आजपासून विदर्भ दौऱ्यावर आहे. विदर्भातील पाच जिल्ह्यात ते जाणार आहेत.

आपल्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात उद्धव ठाकरे विदर्भातील यवतमाळ, वाशीम, अमरावती, अकोला आणि नागपूर या पाच जिल्ह्यातील जनतेशी संवाद साधणार आहे. यावेळी शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. तसेच पक्षाच्या कामाचा आढावाही घेणार आहेत. यावेळी उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या अनुषंगाने काही सूचनाही देणार असल्याचे समजते.

मंत्री संजय राठोड यांचा बालेकिल्ला असलेल्या यवतमाळमधून उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याची सुरुवात होणार आहे. दारव्हा-दिग्रस येथील पोहरादेवीचे दर्शन घेऊन उद्धव ठाकरे यांचा हा दौरा सुरू होणार आहे. दुपारी दोन वाजता ते दारव्हा दिग्रस येथे दाखल होणार आहे. यावेळी ते संजय राठोड यांचा खरपूस समाचार घेणार असल्याचे सांगितले जात आहे.

उद्धव ठाकरे यांचा आजचा दौरा पुढील प्रमाणे असणार आहे.दुपारी २ वा. पोहरादेवी दर्शन. दुपारी ३ वा. यवतमाळ जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा. दुपारी ३.३० वा. वाशीम जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा. सायंकाळी ४ वा. यवतमाळ व वाशीम जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी संवाद.

तर उद्याचा दौरा सकाळी ११ वा. अमरावती जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा. सकाळी ११.३० वा. अकोला जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा. दुपारी १ वा. अमरावती व अकोला जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी संवाद.
सायंकाळी ६ वा नागपूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी संवाद
स्थळ : डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह, नागपूर असा असणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा