मराठा आरक्षण प्रकरणी उद्धव ठाकरे आज पंतप्रधान मोदींची भेट घेणार

मुंबई, ८ जून २०२१: मराठा आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर मराठा समाज नाराज आहे. याप्रकरणी भाजपा व आघाडी यांच्यामध्ये एकमेकावर आरोप प्रत्यारोप चालूच आहेत. दरम्यान मराठा आरक्षणाच्या संदर्भात केंद्र सरकारने भूमिका घ्यावी, अशी मागणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत.
 त्यांच्यासमवेत काँग्रेस नेते  अशोक चव्हाण  व उपमुख्यमंत्री अजीत पवार सुद्धा राहणार आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांची दिल्लीत पंतप्रधानांची ही पहिलीच भेट आहे हे विशेष.संसदेत घटना दुरुस्ती करून ‘ईडब्ल्यूएस’ला ५० टक्के आरक्षण मर्यादा ओलांडता येते, तर मराठा आरक्षणासाठीही घटना दुरुस्ती का केली जाऊ शकत नाही?
 घटना दुरुस्तीचे असेच संरक्षण ‘एसईबीसी’ आरक्षणाला का मिळू शकत नाही? असा नेमका प्रश्न सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला होता. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायद्याला ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडता येणार नाही, असा निर्णय दिला आहे; पण केंद्र सरकारने घटना दुरुस्ती करून ‘ईडब्ल्यूएस’ला ही मर्यादा ओलांडता येईल, अशी तरतूद केली आहे.
त्याच पार्श्वभूमीवर संसदेने मराठा आरक्षणासाठीही अशीच तरतूद केल्यास हा प्रश्न सोडवणे सुकर होईल. त्यामुळे विशेष अधिवेशन घेऊन संसदेत ही घटना दुरुस्ती व्हावी, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून आम्ही करणार आहोत, असे अशोक चव्हाण म्हणाले होते. याआदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटून एक निवेदनही दिले होते. त्याचा पुढचा भाग म्हणून हे तीनही नेते उद्या पंतप्रधानांची भेट घेणार आहेत. त्यासोबतच कोविडशी संबंधित काही विषय बैठकीत चर्चेत येणार आहेत.
इतर विषयांवरही चर्चा…..
नुकताच महाराष्ट्रात वादळाने तडाखा दिला. त्यामुळे झालेल्या नुकसानीची माहिती पंतप्रधानांना देण्यात येणार आहे.
गुजरात आणि आसामला केंद्राने मदत केली आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात वादळाने झालेले नुकसान आणि त्यासाठी केंद्राकडून हवी असणारी मदत, जीएसटीपोटी थकलेली रक्कम हे विषयदेखील पंतप्रधानांसमोर मांडले जातील, अशी माहीती आाहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा