मुंबई: अनेक दशकांपासून प्रलंबित असलेल्या राम जन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं ९ नोव्हेंबर रोजी निकाल दिला. वादग्रस्त जागेत राम मंदिर बांधण्याच्या बाजूने न्यायालयाने निकाल दिला तर मस्जिद साठी उर्वरित जागेतील पाच एकर जागा देण्याचा आदेश कोर्टाने सरकारला दिला. यानंतर उद्धव ठाकरेंनी या निकालाचे स्वागत केले होते. “सुवर्ण अक्षरांनी लिहावा, असा आजचा दिवस आहे. अयोध्येला जाऊन आल्यानंतर वर्षभराच्या आतच हा निकाल आला आहे. आता पुन्हा अयोध्येत जाणार आहे. एक अध्याय संपला आहे. तरी एक नवं पर्व सुरू होत आहे,” असं उद्धव या निकालावर प्रतिक्रिया देताना म्हणाले.
शिवनेरी किल्ल्यावर जाऊन शिवरायांना वंदन करुन तिथली माती घेऊन २४ नोव्हेंबरला पुन्हा अयोध्येत जाण्याचा निर्धार उद्धव यांनी व्यक्त केला होता. मागील वर्षीही ठाकरे कुटुंबीय २४ नोव्हेंबरलाच अयोध्या दौऱ्यावर गेले होते. यंदा राज्यातील राजकीय परिस्थिती स्थिर नसल्याने उद्धव यांनी नियोजित दौरा पुढे ढकलला आहे. राज्यात केव्हा सरकार स्थापन होईल याची निश्चितता सांगता येत नाही त्यामुळे हा दौरा आणखी किती लांबणीवर जाणार आहे हे सुद्धा सांगणे कठीण आहे.