बीडमध्ये काका पुतण्याचा वाद पुन्हा पेटला, संदीप क्षीरसागर यांचे जयदत्त क्षीरसागर यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप

7

बीड, ३१ ऑगस्ट २०२२: राज्यात काका पुतण्यांचे वाद संपूर्ण महाराष्ट्राने अनेकदा पाहिलेले आहेत आणि त्याचे परिणामही पाहिले आहेत. परंतु बीडमध्ये क्षीरसागर काका पुतण्यामध्ये पुन्हा एकदा वाद पेटलेला पहावयास मिळत आहे. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आपल्या नवगण शिक्षण संस्थेमध्ये भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप आमदार संदीप क्षीरसागर यांनी केला आहे.

राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी त्यांचे काका माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्यावर नवगन शिक्षक प्रसारक मंडळ या शिक्षण संस्थेमधून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला असून त्यांच्या चौकशीची मागणी केली आहे. त्यामुळे बीडमध्ये पुन्हा एकदा काका पुतण्याचा वाद पेटल्याचे दिसून येत आहे.

माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची नवगण शिक्षण प्रसारक मंडळ नावाची शिक्षण संस्था आहे. संस्थे अंतर्गत असलेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालयातिल कर्मचार्‍यांकडून, सक्तीने एका महिन्याचा पगार वसूल करण्यात आला आहे. यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे. असा आरोप संदीप क्षीरसागर यांनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, आणि अन्याय झालेल्या कर्मचार्‍यांना न्याय मिळावा अशी मागणी केली आहे.

या संदर्भात आमदार संदीप क्षीरसागर यांनी उच्च व तंत्र शिक्षण सचिव, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू यांच्याकडे सदर प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत या संस्थेवर प्रशासक नेमावा अशी मागणी केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी– अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा