बिहारमध्ये पुन्हा काका-पुतण्याचं सरकार, आज नितीश-तेजस्वी घेणार शपथ, मंत्रिमंडळाची सूत्रही ठरणार

बिहार, १० ऑगस्ट २०२२: बिहारमध्ये भाजपच्या राजकीय फुटीनंतर पुन्हा काका (नितीश कुमार) आणि पुतण्या (तेजस्वी यादव) यांचं सरकार बनणार आहे. आज दुपारी दोन वाजता महाआघाडी सरकारचा शपथविधी सोहळा आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शपथ घेणार आहेत.

त्याचबरोबर बिहारच्या नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाचं चित्रही स्पष्ट झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजदचे सर्वाधिक १६ आमदार मंत्रिमंडळात मंत्री होणार आहेत. यानंतर जेडीयूचे १३, काँग्रेसचे ४, हमचे १ आमदार नव्या सरकारमध्ये मंत्री होतील. त्याचबरोबर डावे पक्ष सरकारला बाहेरून पाठिंबा देत आहेत.

तत्पूर्वी नितीश कुमार यांनी मंगळवारी दुपारी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्याचवेळी सायंकाळी राज्यपालांसमोर सरकार स्थापनेचा दावा मांडण्यात आला. ते आघाडीसोबत सरकार स्थापन करणार आहेत.

एकूण सात पक्ष आणि एका अपक्ष आमदाराने आपल्याला पाठिंबा दिल्याचा दावा त्यांनी केला. त्यांना एकूण १६५ आमदारांचा पाठिंबा आहे. आता आज दुपारी दोन वाजता महाआघाडी सरकारचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शपथ घेणार आहेत.

आमचे आमदार फोडण्याचा होता डाव

जेडीयू विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर नितीशकुमार यांनी भाजपवर आरोप करत भाजपने नेहमीच आमचा अपमान केला असल्याचं सांगितलं. २०१९ मध्येही मंत्री करण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र प्रतिनिधित्व मिळालं नाही.

आरसीपी सिंगच्या माध्यमातून जेडीयूला कमकुवत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. चिराग पासवानच्या माध्यमातून आम्हाला कमकुवत करण्याचा प्रयत्न झाला. आमचे आमदार फोडण्याचा डाव होता. आम्हाला संपवण्याचं षडयंत्र रचलं गेलं.

भाजपसोबतची युती तोडण्याचे कारण स्पष्ट करताना नितीशकुमार म्हणाले की, समाजात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. अनेक प्रकारच्या गोष्टी केल्या जात होत्या, ज्या आम्हाला आवडत नव्हत्या.

तत्पूर्वी, नितीश म्हणाले होते की त्यांनी भाजपशी फारकत घ्यावी, ही पक्षातील सर्व लोकांची इच्छा आहे. आमदार-खासदारांच्या सहमतीनंतर युती तोडण्याचा निर्णय घेण्यात आला.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा