वॉशिंग्टन, १८ डिसेंबर २०२०: २०२० हे संपूर्ण जगासाठी काळं वर्ष म्हटलं तरी वावगे ठरणार नाही. पण, या वर्षाने जेव्हढ्या वेदना दिल्या तिथेच एक सकारात्मक घटनेचा साक्षीदार मात्र या वर्षात होणार आहे. तब्बल ८०० वर्षानंतर अविस्मरणीय योगायोग आला आहे आणि याचे साक्षीदार संपूर्ण जग होणार आहे.
येत्या २१ डिसेंबर रोजी आकाशामध्ये ख्रिसमसचा तारा दिसणार आहे, असं अमेरिकेच्या राइस युनिव्हर्सिटीच्या खगोलतज्ज्ञांनी सांगितलं. या ताऱ्याला ख्रिसमस स्टार किंवा बेथलेहम स्टार असं म्हटलं जातं. २१ डिसेंबर रोजी गुरु आणि शनि आकाशात सरळ रेषेत येतील. मध्ययुगीन काळापासून, गुरु आणि शनि दोन्ही एकत्र पृथ्वीच्या अगदी जवळ आलेले नाहीत.
२० वर्षानंतर गुरु आणि शनि ग्रह नेहमी सरळ रेषेत येतात, परंतु या वर्षी दुर्लभ घटना म्हणता येईल. कारण, हे दोन्ही ग्रह पृथ्वीच्या अगदी जवळ येतील आणि संपूर्ण मानवजात त्यांना पाहू शकतील, अशी माहिती अमेरिकेच्या राइस युनिव्हर्सिटीचे खगोलतज्ज्ञ पॅट्रिक हर्टीगन यांनी सांगितली.
या आधी ४ मार्च १२२६ रोजी आकाशात ख्रिसमस स्टार दिसण्याची अशी दुर्मीळ घटना घडली होती. २१ डिसेंबरला सूर्यास्तानंतर ४५ मिनिटांनी उत्तर गोलार्धात टेलिस्कोपच्या मदतीनं ख्रिसमस स्टार दिसू शकेल. किंबहुना असंही म्हटलं जातंय की, हा अद्भुत नजारा पूर्ण आठवडाभर दिसेल. पुढच्या वेळी असं अद्भुत दृश्य २०८० साली दिसेल.
त्यामुळं सरतेशेवटी का होईना एका सुखद क्षणांचे जग साक्षीदार होणार आहे. पृथ्वी पासून दूर अंतराळात नेहमी काही ना काही नवीन घटना घडत असतात. या वर्षी कोरोना ने संपूर्ण जगाची स्वप्नं भंगवली तरी मात्र मानव आजही त्या परिस्थितीतून वर येऊन जगण्याचा प्रयत्न करतोय आणि आपलं आयुष्य पूर्वपदी घेऊन येत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव