अमरावती, १३ जुलै २०२३ : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे सांगितले जाते. त्यासाठीची सर्व जय्यत तयारी झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संभाव्य मंत्र्यांना फोन करून मुंबईतच राहण्याच्या सूचना केल्या आहेत. त्याचबरोबर आज सकाळी १० वाजता वर्षावर मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या आमदारांची एक बैठकही बोलावण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. तर दुसरीकडे प्रहारचे आमदार बच्चू कडू हे नाराज असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. बच्चू कडू यांचा मंत्रिमंडळ विस्तारात समावेश होणार? अशीही चर्चा आहे.त्यामुळे बच्चू कडू हे आपल्या कार्यकर्त्यांशी बोलून सकाळी ११.०० वाजता निर्णय जाहीर करणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक आमदारांना फोन केल्याचे वृत्त आहे. बच्चू कडू यांनाही मुख्यमंत्र्यांनी फोन करून मुंबईत बोलावले होते. तशी माहितीच बच्चू कडू यांनी दिली. मात्र, मुख्यमंत्र्यांचा फोन येऊनही बच्चू कडू अमरावतीतच आहेत. ते अमरावतीच्या बाहेर पडलेले नाहीत. त्यामुळे उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत. बच्चू कडू यांना मंत्रिपद देण्यात येणार नसल्याने ते नाराज असल्याचे सांगितले जात आहे. बच्चू कडू यांनीही सूचक प्रतिक्रिया व्यक्त केल्याने बच्चू कडू नाराज असल्याच्या चर्चांना बळ मिळत आहे.
मी अमरावतीतच आहे. आता मंत्रिमंडळात सामील व्हायचे की नाही हे मी सकाळी ११ वाजता जाहीर करणार आहे. माझ्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून माझा निर्णय जाहीर करणार आहे. अमरावतीतूनच मी माझा निर्णय जाहीर करणार आहे, असे बच्चू कडू यांनी सांगितले. त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आले आहे. मंत्रिपद मिळत नसल्यानेच बच्चू कडू सकाळी ११ वाजता आपली भूमिका जाहीर करणार असल्याचे सांगितले जात आहे. अपक्षांना सरकारमध्ये काही किंमत आहे की नाही माहीत नाही, असे सूचक विधानही बच्चू कडू यांनी केल्याने चर्चांना अधिकच उधाण आले आहे. बच्चू कडू आज आपला वेगळा निर्णय जाहीर करण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. त्यामुळे महायुतीत पहिली ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर