केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचे राहुल गांधींना पत्र; म्हणाले…

नवी दिल्ली, २१ डिसेंबर २०२२ :जगभरात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी मंगळवारी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना कोरोनासंदर्भातील नियमांचा उल्लेख करत एक पत्र लिहिले आहे.

… अन्यथा यात्रा रद्द करा

या पत्रात आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान कोरोनासंदर्भातील नियमांचे काटेकोरपणे पालन झाले पाहिजे असे म्हटले आहे. तसेच यामध्ये मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर करावा, असे नमूद केले आहे. ज्या नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे अशाच लोकांना भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होता येईल. नियमांचे पालन करा, अन्यथा यात्रा रद्द करा असे म्हटले आहे. सार्वजनिक आरोग्यासंदर्भातील आपत्कालीन स्थिती लक्षात घेता आणि देशहितासाठी असा निर्णय घेणे गरजेचे असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

भारत जोडो यात्रेला भाजप घाबरली : कॉंग्रेस

तर केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांच्या पत्रानंतर भाजपवर टीका करताना कॉंग्रसचे प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले की, देशात भारत जोडो यात्रेदरम्यान कॉंग्रेसला मिळणारे प्रेम पाहून भाजप घाबरली आहे. या संदर्भात त्यांनी ट्विट केले आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा