नवी दिल्ली, १७ सप्टेंबर २०२०: कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर देशातील शिक्षण संस्था बंद आहेत, त्यामुळे सध्या ऑनलाईन शिक्षणाला प्रोत्साहन दिलं जात आहे. केंद्र सरकारने त्यासाठी ८१८ कोटी रुपयांची तरतूद केली आहे अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोख्रीयाल निशंक यांनी आज राज्यसभेत दिली. ते म्हणाले की यातील १६७ कोटी रुपये शिक्षकांच्या प्रशिक्षणावर खर्च केले जाणार आहेत. या चर्चेला उत्तर देताना केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्ष वर्धन म्हणाले की कोरोनाच्या लसीवर व्यापक धोरण आखण्यात येत आहे. सध्या तीन लसींच्या चाचण्या सुरु आहेत. पुढील वर्षीच्या सुरुवातीपर्यंत ही लस उपलब्ध होण्याची आशा आहे असेही त्यांनी सांगितलं.
देशातील कोरोना स्थितीवर आज राज्यसभेतील चर्चा पुन्हा सुरू झाली. यावेळी बोलताना शिवसेनेचे संजय राऊत म्हणाले की केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रित कोरोनाचा सामना केला पाहिजे. यावेळी त्यांनी महाराष्ट्र सरकारने योजलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल म्हणाले की उपाय योजनांबाबत राजकारण आणि आरोप प्रत्यारोप टाळले पाहिजेत.
देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर आता ७८.६४ टक्के इतका झाला आहे. गेल्या २४ तासात ८४ हजारांपेक्षा अधिक रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यामुळे आतापर्यंत बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या आता ४० लाख २५ हजारांपेक्षा अधिक झाली आहे. सध्या सक्रीय बाधित असलेल्या रुग्णांची संख्या एकूण रुग्ण संख्येपेक्षा केवळ एक पंचमाश इतकी आहे. सध्याची उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या १० लाख ९ हजार इतकी आहे. गेल्या २४ तासात देशात १ हजार १३४ रुग्णांचे निधन झालं. त्यामुळ कोरोना मूळे मरण पावलेल्यांची एकूण संख्या आता ८३ हजार १९३ इतकी झाली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी