गोल पोस्ट राष्ट्रीय केंद्रीय मंत्री नारायण राणें यांनी काढली विरोधकांची औकात, मंत्रीपदावरून हकालपट्टी करा आपची...

केंद्रीय मंत्री नारायण राणें यांनी काढली विरोधकांची औकात, मंत्रीपदावरून हकालपट्टी करा आपची मागणी

नवी दिल्ली, ९ ऑगस्ट २०२३ : लोकसभेत अविश्वास ठरावावर सुरू असलेल्या चर्चे दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी उडाली. मणिपूरमधील हिंसेवर बोलत असताना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे, ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत आणि नारायण राणे यांच्यात चांगलीच जुंपली. श्रीकांत शिंदे यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधताच अरविंद सावंत यांनी शिंदे गटाला डरपोक म्हटले. तर नारायण राणे यांनी ठाकरे गटाची लायकीच काढली. त्यावर आम आदमी पार्टीने आक्षेप घेत राणे यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे.

सभागृहात अविश्वास ठरावावरील चर्चेत नारायण राणे यांनी भाग घेतला. यावेळी राणे यांनी ठाकरे गटावर जोरदार टीका केली. यावेळी राणे यांनी ठाकरे गटाची औकात काढली. आमच्या पंतप्रधानांवर बोलण्याचा कुणाला अधिकार नाही. तुमची औकात नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका करण्याची कुणाचीही औकात नाही, असे नारायण राणे यांनी म्हटले. राणे यांनी अपशब्द वापरताच लोकसभेचे पीठासीन अध्यक्ष राजेंद्र अग्रवाल यांनी राणे यांना मध्येच थांबवले. व्यक्तिगत टीका करू नका म्हणून सांगितले. तसेच राणेंना बसायला सांगितले. अध्यक्षांनी दोनदा राणेंना टोकले आणि खाली बसायला सांगितले.

ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी आधी लोकसभेत चर्चेत भाग घेतला. त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. श्रीकांत शिंदे यांच्या आरोपांचे खंडन करत शिंदे गटाचा पळपुटे असा उल्लेख केला. त्यामुळे नारायण राणे बोलायला उभे राहिले. अविश्वास ठरावावर उद्धव ठाकरे गटाच्या अरविंद सावंत यांचे भाषण ऐकल्यावर मी दिल्लीत नव्हे तर महाराष्ट्र विधानसभेत बसलो की काय असे मला वाटले, असे नारायण राणे म्हणाले.

ठाकरे गटाला हिंदुत्वाचा अभिमान आहे तर २०१९ मध्ये तुमचे हिंदुत्व कुठे गेले होते?सत्ता मिळवण्यासाठी तुम्ही भाजपला धोका देऊन शरद पवार यांच्याकडे गेलात. मी १९६७ पासूनचा शिवसैनिक आहे, असे नारायण राणे म्हणाले. ते ऐकताच विरोधक आक्रमक झाले. त्यामुळे राणे अधिकच खवळले. अरे बस,मागे बस असे राणे विरोधकांना म्हणाले. राणे यांच्या या भाषेवर लोकसभा अध्यक्षाने आक्षेप घेत त्यांना थांबण्यास सांगितले.

दरम्यान, आम आदमी पार्टीने ट्विट करून राणे यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे. मोदींचे मंत्री नारायण राणे लोकसभेत एखाद्या गल्लीतील गुंडांसारखी धमकी देत आहेत. मोदी सरकारला केवळ प्रश्न विचारला तरी खासदाराला निलंबित केले जाते. त्यामुळे अभद्र भाषेचा प्रयोग केल्यामुळे भाजपच्या मंत्र्याला निलंबित केले जाणार का? असा सवाल आपने केला आहे. आपने ट्विटमधे राणेंचा लोकसभेतील व्हिडीओही पोस्ट केला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

error: Content is protected !!
Exit mobile version