छत्रपती संभाजी नगरच्या कन्नड येथे आयोजित संकल्प यात्रेला केंद्रीय मंत्र्यांची भेट

कन्नड, छत्रपती संभाजी नगर २६ डिसेंबर २०२३ : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड येथे विकसित भारत संकल्प यात्रेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय मंत्री भूपेंदर यादव व केंद्रीय अर्थ राज्य मंत्री डॉ.भागवत कराड यांची प्रमुख उपस्थिती होती. केंद्र शासनाच्या वतीने आयोजित विकसित भारत संकल्प यात्राअंतर्गत शासनाच्या विविध विभागांच्या योजनांच्या स्टॉलला त्यांनी भेट दिली.

यावेळी, प्रधानमंत्री मोदी साहेबांनी जनसामान्यांपर्यंत शासनाच्या योजना पोहचवण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा सुरु केली आहे असे प्रतिपादन केंद्रीय पर्यावरण, वने व वातावरणीय बदल, कामगार व रोजगार मंत्री भूपेंदर यादव यांनी केले. यावेळी केंद्रीय अर्थ राज्य मंत्री डॉ.भागवत कराड, जिल्हा अधिकारी आस्तिक कुमार पांडे, तसेच महसूल, पंचायत समिती, पशू संवर्धन, कृषी, बँक तसेच इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे मंत्री यादव म्हणाले विकसित भारत आपल्याला बनवायचा आहे आणि आपल्याला येथे येऊन न थांबता २०४७ पर्यंत मोदीजींच्या नेतृत्वात जे व्हिजन त्यांनी उभे केले आहे, त्या विकसित भारत व्हिजनला देशाच्या तरुणांना पुढे घेऊन चालायचे आहे. विकसित भारत संकल्पाने नागरिकांना पुढे नेण्याचे ते काम करतील तेंव्हा आपण एक मजबूत भारत बनवू शकू, असे ते म्हणाले.

केंद्रीय मंत्री डॉ भागवत कराड यांनी आपल्या मार्गदर्शनात २०१४ पासून मोदीजींनी विविध योजना तयार केल्या. त्या जनतेपर्यंत पोहचवण्याकरिता मोदीजींची गॅरेंटी असलेली विकसित भारत संकल्प यात्रेची गाडी आपल्यापर्यंत पोहचवली आहे असे सांगितले. यावेळी प्रधानमंत्री आवास योजना आणि प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत योजनाचे, उज्वला गॅस लाभार्थी आदींनी आपले मनोगत व्यक्त केले आणि मोदी सरकारचे आभार मानले.

भूपेंदर यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्वांनी एकत्रित विकसित भारताची शपथ घेतली. या अभियानाच्या ठिकाणी भारत गॅस व हिंदुस्थान पेट्रोलियम चे उज्वला योजना, महाराष्ट्र बँक व भारतीय डाक विभागाचे सुकन्या समृद्धी योजना, जन धन योजने अंतर्गत सर्व योजना, आरोग्य विभागाचे सर्वांसाठी मोफत उपचार, आरोग्य तपासणी, रक्त तपासणी, आयुषमान भारत, महानगर पालिकेचे हर घर जल, प्रधानमंत्री आवास योजना(शहरी), दीनदयाळ अंत्योदय राष्ट्रीय नागरी योजना, प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत, मतदार नोंदणी, आधार नोंदणी व नूतनीकरण आदी स्टॉल लावण्यात आले होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : रविंद्र खरात

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा