पुणे, २५ जानेवारी २०२३ : वातावरणात अचानक बदल होऊन जालना, औरंगाबाद, नाशिक, नगर जिल्ह्यांसह अनेक ठिकाणी मंगळवारी (ता. २४) अवकाळी पावसाने तडाखा दिला. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी ज्वारी, मका, आडडवा झाला. जानेफळ मिसाळ (जि. जालना) गावात मंगळवारी रात्री जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला. यामुळे गहू आणि ज्वारीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. औरंगाबाद येथेही संध्याकाळी गडगडाटासह पाऊस झाला. नाशिक, नगर जिल्ह्यांतही पाऊस झाला.
ऐन थंडीत वांबोरी (ता. राहुरी, जि.नगर) परिसरात मंगळवार (ता.२४) रोजी रात्री आठच्या सुमारास जोरदार वादळासह गारपीट झाली. या वादळ आणि गारपिटीत गहू, हरभरा कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले.
दरम्यान, राज्यात नगर, औरंगाबाद, जालना, नाशिकसह अनेक ठिकाणी सुमारे २० ते ३० मिनिटे गारांसह मुसळधार पाऊस झाला. आधीच परतीच्या पावसाने विविध भागांतील खरिपाच्या पिकांचे मोठे नुकसान झालेले असताना त्याची भरपाई शेतकऱ्यांच्या पदरी पडलेली नसताना आता पुन्हा रब्बी पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. शेतकरी आता आसमानी संकटापुढे हतबल झाला आहे. शासनाने झालेल्या गारपिटीचा पंचनामा करावा, अशी मागणी होत आहे.
अनेक ठिकाणी किमान तापमान दोन ते तीन अंश वाढले असून, ता. ३० जानेवारीनंतर थंडी वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. बुधवारी (ता. २५) मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
बुधवारी (ता.२५) औरंगाबादसह बीडमध्ये पावसाची शक्यता आहे. प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या माहितीनुसार मराठवाडा विभागामध्ये पुढील पाच दिवस किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही. ता. २७ जानेवारी ते दोन फेब्रुवारीदरम्यान किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहून तुरळक ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे.
विस्तारित अंदाजानुसार मराठवाड्यात ता. २९जानेवारी ते ४ फेब्रुवारीदरम्यान कमाल तापमान मध्यम प्रमाणात सरासरीपेक्षा कमी तर किमान तापमान सरासरीएवढे, तर पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील