नाशिक, ५ मार्च २०२३ : नाशिक जिल्ह्यात काही भागांत गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांसह हातावर पोट असणाऱ्या सामान्य जनतेची चिंता वाढली आहे.
नाशिक जिल्ह्यातील बागलाण, कळवणसह अन्य काही ठिकाणी तालुक्यांमध्ये वातावरण बदलामुळे अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. बागलाणच्या पश्चिम पट्ट्यातील मुल्हेर, कांद्याचामळा या गावांसह, कळवणच्या अंबुर्डी, चनकापूर, बोरदैवत परिसरात पावसाने हजेरी लावली.
अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला गहू, हरभऱ्यासह आंबा मोहोराला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीमुळे शेतकरी पुन्हा अस्मानी संकटात सापडला आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे परिसरातील कांदा, आंब्यासह अन्य पिकांना फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे, त्यामुळे शेतकरी चिंतातुर झाला आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील