अवकाळी पावसाचा तडाखा, पण ठाकरे सरकार बळीराजाच्या पाठिशी: शिवसेना

मुंबई, २३ मार्च २०२१: राज्यात गेल्या दोन दिवसांपासून ठिक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. तर अनेक ठिकाणी गारपीट देखील झाली. काल देखील राज्यात बऱ्याच ठिकाणी गारपीट सह मुसळधार पाऊस पडला. पुण्यातील मावळ, कोल्हापूर, अमरावतीतसेच राज्यातील इतर अनेक जिल्ह्यांमध्ये आणि ग्रामीण भागात पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यावर सामना मध्ये आजच्या अग्रलेखात शिवसेनेकडून शेतकऱ्यांना या संकटाच्या काळात मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

निसर्गाची लहर मानवी नियंत्रणापलिकडेच आहे. मात्र निसर्गावर कोणाचे नियंत्रण नाही असे म्हणून हतबल होऊन कसे चालेल? कोरोना निर्बंध आणि अवकाळीमुळे संकटात सापडलेल्या बळीराजाला, ग्रामीण अर्थव्यवस्थेला मदतीचा भक्कम हात देऊन उभे करावेच लागेल. राज्य सरकार त्यासाठी कटिबद्ध आहे, असा विश्वास आजच्या सामना अग्रलेखातून राज्यातील बळीराजाला देण्यात आला आहे.

कोरोनाची दुसरी लाट आणि पुनःपुन्हा बसणारा अवकाळीचा तडाखा अशा दुहेरी संकटांना सध्या महाराष्ट्र तोंड देत आहे. महाराष्ट्र या दोन्ही संकटांना तोंड देण्यास समर्थच आहे. सरकारचे प्रयत्न आणि नागरिकांचे सहकार्य यामुळे कोरोनाचे पुन्हा वर आलेले भूत नक्कीच परत गाडले जाईल, असेही या अग्रलेखात म्हटले आहे.

अवकाळी हे जणू नेहमीचे संकट झाले आहे

मागील दोन-तीन दिवसांपासून राज्याच्या मोठ्या भागाला अवकाळी पाऊस, गारपीट याचा तडाखा बसत आहे. नेहमीप्रमाणे त्याचा फटका बळीराजालाच बसला आहे. गेल्या वर्षीपासून अवकाळी हे जणू नेहमीचे संकट झाले आहे. गेल्याच महिन्यात राज्याच्या मोठ्या भागाला अवकाळी पावसाचा फटका बसला होता. आता मार्चमध्ये परत त्याची पुनरावृत्ती झाली आहे. चार महिन्यांत तिसऱ्यांदा हा तडाखा बसला. म्हणजे अवकाळी आणि शेतातील उभ्या पिकाची नासाडी हे दर महिन्याचे संकट झाले आहे.

फळे आणि भाज्यांचे नुकसान

दोन-तीन दिवसांपासून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात या संकटाने थैमान घातले आहे. त्यामुळे गहू, हरभरा, भाजीपाला, संत्र, द्राक्ष, आंबा, पपई, कलिंगड आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आधीच द्राक्षाचे भाव पडले आहेत, त्यात अवकाळीच्या तडाख्याने आहे त्या द्राक्षबागांचे नुकसान केले आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांवर पडेल त्या किमतीला द्राक्ष विकण्याची वेळ येऊ शकते. विदर्भातील संत्रा पिकाचीही अवस्था त्यापेक्षा वेगळी नाही. यंदा संत्रा उत्पादन चांगले होईल अशी अपेक्षा होती. मात्र अवकाळीच्या लागोपाठ बसलेल्या तडाख्यांनी त्या अपेक्षेवर पाणी फेरले गेले आहे. दोन दिवसांपासून होत असलेल्या पावसाने संत्राला गळती लागली आहे. गहू, हरभरा या पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. ही दोन्ही पिके शेतातच मातीमोल झाली आहेत.

राज्य सरकार कटिबद्ध

कोरोनाची दुसरी लाट आणि पुनःपुन्हा बसणारा अवकाळीचा तडाखा अशा दुहेरी संकटाला सध्या महाराष्ट्र तोंड देत आहे. महाराष्ट्र या दोन्ही संकटांना तोंड देण्यास समर्थच आहे. कोरोना निर्बंध आणि अवकाळीमुळे संकटात सापडलेल्या बळीराजाला, ग्रामीण अर्थव्यवस्थेला मदतीचा भक्कम हात देऊन उभे करावेच लागेल. राज्य सरकार त्यासाठी कटिबद्ध आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा