पुणे, १५ जून २०२३ : २०१९ च्या विधानसभा निवडणुकी नंतर उद्धव ठाकरे यांनी भाजप पासून फारकत घेत काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत आघाडी करून मविआचे सरकार स्थापन केले. तेव्हापासून आजपर्यंत उद्धव ठाकरे आणि भाजपने एकमेकांवर कायमच कुरघोडी केल्याचे पाहायला मिळते. एक वर्षांपूर्वी शिंदे गटाला सोबत घेऊन भाजपने मविआ सरकार उलथवले, तेव्हापासून या वाक-युद्धाचा जोर अधिक वाढल्याचे दिसून आले. पण आता भाजपच्या एका बड्या नेत्याने ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना थेट ऑफर दिली आहे.
उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी उद्धव ठाकरे यांना खुली ऑफर दिली आहे. उद्धव ठाकरे यांना जर भाजपसोबत यायचे असेल तर त्यासाठी त्यांना भाजपची दारे कायम खुली आहेत. मात्र उद्धव ठाकरेंनी याविषयी आमच्या राष्ट्रीय नेतृत्वाशी चर्चा करावी. आम्ही उद्धव ठाकरेंकडे जाणार नाहीत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या विरोधात गेले. त्यांनी खुर्चीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा केली, असे वक्तव्य केशवप्रसाद मौर्य यांनी केले आहे.
मागील वर्षी शिवसेना (शिंदे गट)-भाजप युतीचे सरकार महाराष्ट्रात सत्तेवर आल्यापासून, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे त्याचबरोबर इतर वरिष्ठ नेतेही, उद्धव ठाकरे यांच्याबरोबर यापुढे कदापी युती करणार नाही, अशी वक्तव्य करत आहेत. त्यातच आता उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. मोदी महाजनसंपर्क अभियानाच्या निमित्ताने केशव प्रसाद मौर्य हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. या दरम्यान त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी- अनिल खळदकर