ऊर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत प्रवेश, शिवसेनेची धुरा रश्मी ठाकरे यांच्या हाती..?

मुंबई, १ डिसेंबर २०२०: गेल्या दोन-तीन दिवसांपासून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्या शिवसेनेतील प्रवेश यावरून अटकळी लावल्या जात होत्या. काही माध्यमांमध्ये त्या काल शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची बातमी होती. मात्र, अखेर आज त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोंडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

विशेष म्हणजे रश्मी ठाकरे यांनी उर्मिला यांच्या हाती शिवबंधन बांधले. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारची सूत्र उद्धव ठाकरेंकडे, तर शिवसेनेची सूत्र रश्मी ठाकरेंकडे असल्याची चर्चा आहे. याबाबत आणखीन एक घडामोड अशी की शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या संपादकपदी रश्मी ठाकरे यांची मार्च महिन्यात निवड करण्यात आली. रश्मी ठाकरे यांच्या नियुक्तीसह त्यांना ‘सामना’च्या पहिल्या महिला संपादक होण्याचा सन्मान मिळाला. या दोन्ही घटना अशा सूचित करतात की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या वरील भार कमी करत पक्षाची जबाबदारी रश्मी ठाकरे यांच्यावर सोपवत आहेत.

रश्मी ठाकरे राजकारणात फारशी प्रत्यक्षपणे सक्रिय नसल्या तरी पडद्याआड त्यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. दैनिक सामनाच्या संपादक, शिवसेनेच्या संलग्न संघटनाच्या अध्यक्ष, मातोश्री महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्ष, मातोश्री महिला बचत गट महासंघाच्या अध्यक्ष अशा जबाबदाऱ्या त्या सांभाळत आल्या आहेत. उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेसारख्या मोठ्या राजकीय पक्षाच्या नेतृत्वाची दुहेरी जबाबदारी सांभाळत आहेत. त्यातच कोरोनाच्या संकट काळात मुख्यमंत्र्यांवर अतिरिक्त ताण आहे. त्यामुळे त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी पक्षनेतृत्वाचा भार काहीसा हलका केल्याचे दिसते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा