नवी दिल्ली, दि. २८ मे २०२०: भारत आणि चीन सीमा विवादात आता अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्ती करण्याची तयारी दाखवली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की भारत आणि चीनमधील सीमा विवादांच्या मुद्यावर अमेरिका मध्यस्थी करण्यास तयार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट केले की, ‘आम्ही भारत आणि चीन या दोघांनाही माहिती दिली आहे, त्यांना हवे असल्यास अमेरिका सीमा विवादात मध्यस्थी करण्यास तयार आहे. ‘
या महिन्याच्या सुरुवातीपासूनच चीनने लडाख सीमेजवळ आपली सैन्यांची गस्त वाढवली होती, तसेच सैन्यांचे तळ, सैनिकांची संख्या देखील वाढली होती. यानंतर प्रत्युत्तर म्हणून भारताने देखील आपल्या सैन्य तळांची संख्या वाढवण्यास सुरुवात केली होती.
याला अनुसरूनच काल नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या कार्यालयांमध्ये लडाख विषयावरती चर्चा केली होती. या चर्चेमध्ये त्यांनी सीमेवर असलेली सध्याची परिस्थिती आणि उपलब्ध असलेल्या साधनसामग्री तसेच सैनिकांचा आढावा घेतला होता. या चर्चेला तिन्ही सैन्यदलाचे प्रमुख उपस्थित होते व त्यांनी पुढील कार्यवाहीसाठी ब्ल्यू प्रिंट देखील सादर केले होते.
या बैठकीस राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल हेदेखील उपस्थित होते. या दरम्यान या विषयावर लष्करप्रमुख, सीडीएस कडून ब्लू प्रिंट मागितला गेला. पंतप्रधान मोदींच्या बैठकीपूर्वी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची या विषयावर बैठक झाली आणि लडाख सीमेवर भारत आपल्या रस्त्याचे बांधकाम थांबवणार नाही असा निर्णय घेण्यात आला.
अमेरिका आणि चीन यांच्यात वाद
अमेरिका भारत आणि चीन यांच्यातील सीमा वादामध्ये मध्यस्थी करण्यासाठी पुढे आला आहे. परंतु, चीन आणि अमेरिका यांच्यामध्ये सुद्धा गेली बरीच वर्षे वादविवाद चालू आहेत. त्यात सध्याचे नवीन कारण म्हणजे कोरोनाव्हायरसचे संकट. अमेरिका सातत्याने चीनवर आरोप ठेवत आला आहे की, कोरोनाव्हायरस चीन मधूनच बाहेर पडला आहे व त्याला जबाबदार चीन असल्याचे ट्रम्प यांनी अनेकदा म्हटले आहे.
नेपाळला उकसवण्याचा प्रयत्न
चीन नेपाळला भारताविरोधात उकसावण्याचा प्रयत्न करत आहे. लष्कर प्रमुख नरवणे यांनीदेखील असे विधान केले होते. ते म्हणाले होते की नेपाळ आणि भारत सीमा वादामध्ये नेपाळनेजी भूमिका घेतली आहे त्यामागे तिसऱ्या कोणाचातरी हात आहे. त्यांचा सरळ इशारा चीनकडे होता. नेपाळमधील राजकीय घडामोडींमध्ये चीन ढवळाढवळ करत असल्याचे देखील या आधी दिसून आले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी