यू एस, दि. ३० मे २०२०: कोरोना साथीच्या आजाराने सर्वाधिक त्रस्त झालेल्या अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेमधून माघार घेण्याची घोषणा केली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, डब्ल्यूएचओ पूर्णपणे चीनच्या नियंत्रणाखाली आहे.
अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, चीन डब्ल्यूएचओला वर्षाला ४० दशलक्ष डॉलर्स देत आहे, तर अमेरिकेने डब्ल्यूएचओला वर्षाला सुमारे ४५० दशलक्ष डॉलर्सचे अनुदान दिले आहे तरी सुध्दा डब्ल्यूएचओ चीनच्या नियंत्रणाखाली आहे. डब्ल्यूएचओने सुधारणांबाबत केलेली शिफारस अंमलात आणली गेली नाही, म्हणून अमेरिका डब्ल्यूएचओ बरोबरचे संबंध तोडत आहे.
अमेरिकेच्या लक्ष्यावर डब्ल्यूएचओ
यापूर्वी अमेरिकेने डब्ल्यूएचओला दिलेली मदत रोखली होती, अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी डब्ल्यूएचओवर कोरोना विषाणूची ओळख पटविण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केला आणि चीनला पाठिंबा दिल्याबद्दल टीका केली.
तसेच, अध्यक्ष ट्रम्प यांनी डब्ल्यूएचओ संचालकांना एक पत्र लिहिले आहे, ज्यात त्यांनी ३० दिवसांत संघटनेत मोठे बदल करण्यास सांगितले होते. अन्यथा अमेरिका आपला निधी कायमचा बंद करेल आणि संघटनेपासून विभक्त होण्याचा विचार करू शकेल. कोरोना विषाणूच्या मुद्द्यावर डब्ल्यू एच ओ चीनची पूर्ण बाजू घेत आहे असा आरोप ट्रम्प यांनी केला होता. डब्ल्यूएचओच्या घोर दुर्लक्षांमुळे जगाला त्रास होत असल्याचा अमेरिकेकडून सतत आरोप होत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी