राजभाषा मराठीच्या प्रचार, प्रसार, संवर्धनासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेत ‘मराठी’चा वापर

पिंपरी, ता. १६ ः राज्याची राजभाषा असलेल्या मराठी भाषेच्या प्रचार व प्रसारासाठी, तसेच मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त व्हावा आणि मराठी भाषेचे संवर्धन व्हावे, या हेतूने शनिवारपासून (ता.१४ जानेवारी) ते शनिवारपर्यंत (ता. २८ जानेवारी) राज्य सरकारने ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ जाहीर केला आहे.

राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळं, केंद्र सरकारच्या अखत्यारीतील सर्व महामंडळं, सार्वजनिक उपक्रम, सर्व खासगी आणि व्यापारी बँका, सर्व शैक्षणिक संस्था यांनी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा राज्यभर साजरा करावा, अशा सूचना मराठी भाषा विभागाने एका परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत.

याअंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्व कार्यालयांत व सार्वजनिक उपक्रमांमध्ये ‘मराठी युनिकोड’चा वापर करावा, अशा सूचना अधिकारी व कर्मचाऱ्यांना केल्या आहेत, अशी माहिती, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांनी दिली.

दरम्यान, महापालिका कार्यालयातील मराठीमधील कामकाजामध्ये अधिक सुसूत्रता आणणे, कुठल्याही संगणकावर तयार केलेल्या शासकीय कामकाजाची कागदपत्रे (नस्ती) कुठल्याही संगणकावर वाचता यावीत, भविष्यासाठी व्यवस्थितरीत्या जतन करणे सोयीचे व्हावे, यासाठी महापालिकेच्या सर्व कार्यालयांमध्ये ‘युनिकोड’ मराठीचा वापर अनिवार्य केला आहे; तसेच महापालिकेची सर्व कार्यालये व सार्वजनिक उपक्रमांत ‘मराठी युनिकोड’चा वापर करणे शक्य व्हावे, यासाठी माहिती व तंत्रज्ञान विभागातील कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण घ्यावे. या सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबत दक्षता घ्यावी, अशा सूचना जांभळे यांनी केल्या आहेत.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा