शरद पवार यांनी घेतली लस ? सिरम इन्स्टिट्यूट च्या भेटीत स्पष्टीकरण

पुणे, २ ऑक्टोंबर २०२०: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ला भेट दिली. सध्या सिरम इन्स्टिट्यूट देशातच नव्हे तर पूर्ण जगभरात चर्चेत असणारी कंपनी आहे. पूर्ण जगात सर्वात जास्त लसींचं उत्पादन करणाऱ्या कंपन्यांपैकी एक म्हणून सिरम इन्स्टिट्यूट कडं पाहिलं जातं. या भेटीत पवारांनी सीरम इन्स्टिट्यूटमध्ये तयार करण्यात येत असलेल्या कोरोनावरील लसीच्या कामाची माहिती घेतली. मात्र या दरम्यान शरद पवार यांनी लस घेतल्याची चर्चा सर्वत्र सुरू झाली होती.

शरद पवारांबाबत सुरू असलेल्या या चर्चेबद्दल स्पष्टीकरण देण्यासाठी शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम लावत सांगितलं की, मी कोरोनावरील लस घेतली असं लोक म्हणत आहेत, परंतु ते खरं नाही. त्यांच्याकडं (सीरम इन्स्टिट्यूट) आत्ता रोग प्रतिकारशक्ती वाढवणारी (आरबीसीजी ट्रिपल बुस्टर) लस आहे. ती लस आज मी घेतलीय. माझ्यासोबत माझ्या स्टाफने देखील ही लस घेतली आहे. सीरम इन्स्टिट्यूटची कोरोनावरील लस यायला जानेवारी उजाडेल.

यापूर्वी एक ऑगस्ट रोजी देखील शरद पवार यांनी सिरम इन्स्टिट्यूट ला भेट दिली होती. यावेळी ही त्यांची ही दुसरी भेट होती. मागच्या वेळेस देखील त्यांनी सिरम इन्स्टिट्यूट ला भेट देऊन कोरोनावरील लस बनवण्याचं काम कसं सुरु आहे? याची माहिती घेतली होती.

दरम्यान या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी हाथरस येथील घटना आणि उत्तर प्रदेश पोलिसांवर संताप व्यक्त केला. पवार म्हणाले की, हाथरस येथील घटनेतील पीडित तरुणीच्या मृतदेहाची उत्तर प्रदेश पोलिसांनी परस्पर विल्हेवाट लावली. असा प्रकार देशात कधीच घडला नाही. उत्तर प्रदेश पोलिसांनी कायदा हातात घेऊन केलेल्या कृत्याचा देशभरातून संताप उमटलेला असून जनतेची रिअॅक्शन योग्यच आहे.

पवार म्हणाले की, उत्तर प्रदेश पोलिसांनी कायदा हातात घेऊन टोकाची भूमिका घेतली. त्यामुळे देशभरातून संताप व्यक्त होत आहे. माणूसकीच्या दृष्टीकोनातूनही पोलिसांनी असं वागायला नको होतं. त्यामुळे देशातील जनतेमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून जनतेची रिअॅक्शन ही योग्यच आहे.

उत्तर प्रदेश सरकारने त्या मुलीचा मृतदेह तिच्या कुटुंबीयांना का दिला नाही? पीडित मुलीच्या कुटुंबीयांना भेटायला जाणाऱ्या नेत्यांची तुम्ही अडवणूक का करता? याचाच अर्थ उत्तर प्रदेशात कायद्याचं राज्य आणि मूलभूत अधिकार याला काही अर्थ राहिला नाही. महाराष्ट्रात अशा घटना घडल्यावर तात्काळ अॅक्शन घेतली जाते. पण उत्तर प्रदेशात लागोपाठ दोन घटना घडल्यानंतरही काहीच कारवाई करण्यात आली नाही. याचा अर्थ राज्य सरकार बघ्याची भूमिका घेत आहे असा होतो, असंही ते म्हणाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा