नवी दिल्ली, २६ जानेवारी २०२१: जगातील सर्वात मोठा लसिकरण कार्यक्रम देशात सुरु झाला आहे. भारतीय बनावटीची भारत बायोटेक निर्मित कोविशिल्ड आणि सिरम इन्स्टिट्यूट उत्पादित कोव्हॅक्सीन या दोन लस भारतात वापरल्या जात आहेत. देशभरात राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात काल दहाव्या दिवशी लसीकरण कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
देशभरात लसीकरण करण्यात आलेल्या एकूण आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांची संख्या १९.५ लाखांपेक्षा अधिक झाली आहे. अहवालानुसार ३५,७८५ सत्रांत एकूण १९,५०,१८३ (काल ७.१० वाजेपर्यंत) लाभार्थ्यांचे लसीकरण झाले.
देशभरातील कोविड-१९ लसीकरणाच्या दहाव्या दिवशी काल संध्याकाळी ७.१० पर्यंत ७१७१ सत्रांमध्ये ३,३४,६७९ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. अंतिम अहवाल काल रात्री उशीरापर्यंत पूर्ण होणार होता.
दरम्यान काल पर्यंत राज्यात १,३५,६०९ लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. लसीकरण मोहिमेच्या दहाव्या दिवशी संध्याकाळी ७.१० वाजेपर्यंत देशभरात ३४८ एईएफआयची (लसीकरणानंतर झालेला थोडा त्रास) नोंद झाली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे