न्यूयॉर्क, १५ डिसेंबर २०२०: अमेरिकेत कोरोना लसचा पहिला डोस सोमवारी देण्यात आला आहे. या लसीचा पहिला डोस न्यूयॉर्कमधील नर्स सँड्रा लिंडसे यांना दिला गेला. कोरोना लसीकरण कार्यक्रम थेट टीव्हीवर देखील दर्शविला गेला. कोरोनाची लस घेतल्यानंतर नर्स म्हणाल्या, ‘मला आज खूप आशा वाटली आहे व आराम मिळाला आहे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही ट्विट करुन आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी सांगितलं की, कोरोना लसीचा पहिला डोस अमेरिकेत देण्यात आला आहे.
ट्रम्प यांनी आपल्या ट्विटर हँडलवर लिहिलं, “‘अभिनंदन अमेरिका. पहिल्या लसीचा डोस देण्यात आला आहे. संपूर्ण जगाला शुभेच्छा.”
कोरोना विषाणूमुळं ३२६३ लोकांचा मृत्यू झाल्यानं बुधवारी अमेरिकन प्रशासनानं कारवाईचा बडगा उगारला आणि फायझर आणि बायोटेकच्या कोविड -१९ या लसीचा आपत्कालीन वापर मंजूर झाला. अमेरिकेच्या रोग नियंत्रण व प्रतिबंधक केंद्रांच्या लसीकरण समितीनं शनिवारी १६ वर्षे व त्याहून अधिक वयाच्या लोकांना लस देण्याच्या समर्थनात मतदान केलं.
अमेरिकन औषध निर्माता फायझरनं बहुप्रतिक्षित कोविड -१९ लसीची पहिली खेप मिशिगनच्या आपल्या गोदामातून पाठविली आहे. नुकतीच अमेरिकेत ही लस मंजूर झाली असून कोविड -१९ लस सुरू झाल्यानं अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम सुरू झाली आहे.
कोरोना विषाणूमुळं पीडित जगातील अव्वल देशांमध्ये अमेरिका आहे. कोरोनासारख्या साथीच्या रोगानं तेथे लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यातून लोकांना वाचवण्यासाठी आता अमेरिकन सरकारनं मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरू केलं आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे