साडेआठ लाखांची लाच घेताना वैजापूरचे उपविभागीय जलसंधारण अधिकारी ऋषिकेश देशमुख यांना रंगेहाथ पकडले

औरंगाबाद, ७ फेब्रुवारी २०२३ : आठ लाखांची लाच घेताना वैजापूर (जि. औरंगाबाद) येथील उपविभागीय जलसंधारण अधिकारी ऋषिकेश देशमुख लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले. कोल्हापुरी बंधाऱ्याच्या कामाचे बिल काढण्यासाठी तक्रारदाराकडे लाचेची मागणी करण्यात आली होती. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.

महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ औरंगाबाद येथे ८ लाख ५३ हजार २५० रुपये लाच स्वीकारताना ऋषिकेश देशमुख, उपविभागीय जलसंधारण अधिकारी, वैजापूर आणि सहकारी भाऊसाहेब दादाराव गोरे, लिपिक, महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ कार्यालय, औरंगाबाद यांना सोमवारी (ता. सहा) अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात तक्रारादराने परभणी येथे चौंडेशवरी कन्स्ट्रक्शन, परभणी या कंपनीच्या नावावरती कोल्हापुरी बंधाऱ्याचे गवळी पिंपळी (ता. सोनपेठ, जि. परभणी) येथील १८ लाख रुपये, तर गोविंदपूर (ता. पूर्णा, जि. परभणी) येथील कामाचे १ कोटी १९ लाख असे मिळून दोन्ही कामांचे १ कोटी ३७ लाख रुपये किमतीची बिले काढण्यासाठी व्यवस्थापकीय संचालक सुनील कुशिरे यांच्यासाठी ७.५ टक्के याप्रमाणे एकूण ८ लाख ३ हजार २५० रुपये स्वतःसाठी, तर महामंडळ कार्यालयाचे ५० हजार रुपये असे एकूण ८ लाख ५३ हजार २५० रुपये किमतीची लाचेचे मागणी केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सदरील तक्रारदाराच्या तक्रारीची पडताळणी करून त्यांनतर पथकाकडून सापळा लावून सोमवारी (ता. सहा) महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ, औरंगाबाद येथील कार्यालयासमोर आरोपी यांच्या इनोव्हा कारमध्ये (एम-२०, एफजी- ५००५) लाच स्वीकारताना लाचलुचपत पथकडून रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

ही कारवाई औरंगाबाद परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक संदीप आटोळे, विशाल खांबे अपर पोलिस अधीक्षक, औरंगाबाद, सुदाम पाचोरकर, पोलिस उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शंकर महादेव मुटेकर, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना, पोलिस अंमलदार गाजनान कांबळे, जमधडे, बुजाडे, खंदारे, गिरम, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना यांनी केली.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : विनोद धनले

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा