वन्यप्राण्यांच्या अस्तित्वाची लढाई

सामान्यतः आपण म्हणतो कि,वन्य प्राणी मानवी वस्तीत घुसण्याचे प्रकार वाढले आहेत. पण आपण हे हि सत्य नाकारू शकत नाही कि मनुष्याने,वन्यप्राण्यांच्या हक्काच्या जागेत त्यांच्या जंगलात घुसखोरी केलीय. हि घुसखोरीच म्हणावी लागेल, कारण मनुष्याने अक्षरशः जंगले पोखरून टाकली आहेत. वन्य प्राणी आणि मानव यांचा संघर्ष सुरु आहे. पण संघर्ष नेमका कशामुळे वाढतोय ,याचा वेध घेण्याचा हा प्रयत्न.
सध्या बिबटे,वाघ, गवे, रानडुक्कर, हत्ती आदी वन्य प्राण्यांनी मानवी वस्तीत घुसून धुमाकूळ घालण्याचे प्रकार खूप वाढले आहेत. वन्य प्राण्यांनी मानवावर हल्ले करण्याचेही प्रकार घडत आहेत. त्यामुळे मानवी वस्तीत घबराटीचे वातावरण निर्माण झालंय. शेती ची हानी होत आहे. हे सगळं खरं असलं तरी याला जबाबदार स्वतः मनुष्यच आहें असा निष्कर्ष आहे.
शेती व उद्योगधंदाच्या विस्तारासाठी तसेच नद्यांच्या प्रकल्पासाठी जमीनीची मागणी सारखी वाढत राहिल्यामुळे वनांचा सतत नाश होत आहे. आज गावागावात दिसत असलेली ही वनराई पूर्वजांनी सातत्याने केलेल्या वृक्षसंवर्धनाची जाणीव करुन देतात. वृक्षसंवर्धनाची जागा अतिक्रमणे, अनिर्बंध कटाई, वणवे आणि अनियंत्रित चराई यांनी घेतली आहे. अद्यापही आपल्या देशांत इंधन म्हणून जळाऊ लाकडांचा प्रामुख्याने उपयोग केला जातो. जलस्त्रोत कमी झाले. प्रदूषण वाढले आणि म्हणूनच वन्यप्राण्यांची घुस्मट होते. अशा परिस्थितीत तहान, भक्ष्य, निवारा यांच्या शोधार्थ वन्य प्राण्यांनी मनुष्य वस्तीकडे मोर्चा वळविला आहे.
वन्य प्राणी आणि मानव संघर्षाची ही समस्या पूर्वी नव्हती. परंतु दिवसेंदिवस ही समस्या अधिक गंभीर का बनत आहे, यावर प्रभावी उपाययोजना होणे अत्यंत गरजेचे आहे.
राज्यात बिबट्या आणि पट्टेरी वाघांचा वावर वाढला आहे. मानवी वस्तीत घुसून पाळीव प्राण्यांवर हल्ले करण्याच्या व त्यांचा फडशा पाडण्याच्या किमान पाच सहा तरी घटना रोजच ऐकण्यात येत आहेत. बिबट्या किंवा वाघाने माणसावर हल्ला करण्याचे प्रकार त्या मानाने कमी घडले आहेत. तथापि, गाईची वासरे, कुत्रे, मांजरे यांचा बिबट्यांनी फडशा पाडला आहे. हत्तींनी हि राज्याच्या काही भागात शेती-बागायतीची प्रचंड प्रमाणात नुकसानी केली आहे. नुकसानग्रस्त शेतक-यांना सरकारकडून दिरंगाईने आणि तोकडी मदत मिळत आहे. रानडुकरांनी बागायतीवर अतिक्रमण करून पिकांची नासाडी केली. या सगळ्या गोष्टींमुळे वन्यप्राणी खलनायक ठरत आहेत. पण त्यांची अडचण समजून घ्यायला कोणीच तयार नाही. वन्यजीवामुळे जीवित अथवा वित्त हानी झाली, कि संघर्ष हा अटळ ठरतो.
आपल्याकडे नावाला वन्य प्राणी संरक्षण कायद्यान्वये त्यांना संरक्षण आहे,तेवढेच! कायदा हातात घेऊन त्यांची होणारी हत्या कोण थांबवणार? जेंव्हा ‘अवनी’ सारख्या वाघांना मारले तेंव्हा सुद्धा तो साधा वाघ नव्हता,अशी वातावरणनिर्मिती करणारे राजकारणी च स्वतः कायद्याचं भक्षण करणारे वाघ बनले आहेत. वन संपत्ती नष्ट करणे, तिचा वाढता -हास न थांबविणे ही प्रवृत्ती अत्यंत घातक ठरली आहे.
आजचे वन्यजीवन हे संपूर्णपणे मानवी इच्छेवर बेतलेले आहे. पण जर हे वन्यजीवनच नष्ट झाले तर त्या बरोबर परिसंस्थाच नष्ट होऊन त्याची परीणती शेवटी मानवाच्या विनाशात होईल, याचे फार थोड्या लोकांनाच आकलन आहे. आजचा वाढत चाललेला मानव- वन्यजीव संघर्ष , शहर आणि खेडी या दोन्ही ठिकाणी तितकाच तीव्र आहे. वन्यजीव आणि विकास या मधली दरी इतकि मोठी कधीच नव्हती जितकी ती आज आहे. यातून फायदा कोणाचाच नाही.
सध्या वन्य प्राणी आपल्या जीवन अस्तित्वासाठी संघर्ष करीत आहेत. हा संघर्ष सध्या सीमित आहे, तो आणखी वाढला तर, त्याचा धोका मानवांनाच अधिक आहे.त्याकरीता समस्या निर्मितीमागची कारणे शोधून त्यावरती उपाय करण्याची आवश्यकता आहे.
पकडलेल्या वन्य प्राण्यांना वनखाते दुस-या वन्यप्राणीवस्तीत सोडून देते. पण हा त्यावरती उपाय नव्हे. वन संपत्तीचे जतन करणे, नवी वनराई निर्माण करणे, डोंगर माथ्यावर जंगली झाडांची लागवड करणे या गोष्टी युद्धपातळीवर व्हायला हव्यात. आत्ताच कठोर निर्णय घेतल्यास भविष्यात वन्य प्राण्यांना निवार्यासाठी वने उपलब्ध होतील.
बेसुमार भूउत्खनन, बेकायदेशीर व्यवसाय थांबायलाच हवेत. नैसर्गिक संपत्तीचे संवर्धन व्हायलाच हवे. शिकार करण्याची चटक लागलेले लोक फासे लावतात.त्यावर प्रतिबंध यायला हवा.बेकायदेशीर हत्या थांबवणे गरजेचे आहे.
वन्यप्राणी व मानव यामधील वाढता संघर्ष दोन्ही घटकांचे जीवन धोक्यात आणणारा आहे. म्हणून वरकरणी क्षुल्लक वाटणा-या या विषयावर सकारात्मक दृष्टीकोन ठेवून विचारमंथन व्हायला हवे. हे विचारमंथन वन्य प्राणी करू शकत नाहीत. ते सामाजिक प्राणी म्हणून संबोधल्या जाणा-या मनुष्यानेच करायला हवे.
वृक्षतोड करून किती पैसा जमवता येईल हा व्यवहारी दृष्टीकोन ठेऊन आपण कृती करतो. वन्य प्राण्यांना ते प्राणी आहेत, त्यांचेही कुटुंब जीवन आहे, ही दृष्टी ठेऊन त्यांना संरक्षण देण्याऐवजी आपण त्यांची हत्या करून विक्री करतो, केवळ धन-द्रव्याच्या हव्यासापायी…! हे सारे कितपत योग्य, जीवनपोषक आहे? हे तर जीवन शोषक आहे. प्रत्येक जीव, प्राणीमात्र स्वतःवरती प्रेम करतो. वन्य प्राणीही त्याला अपवाद नाहीत. हे आपल्या लक्षात यायला आपण आपली मानसिकता बदलायला हवी. तसे झाले तर, वन्यप्राणी-मानवी संघर्ष समस्येतून वन्यप्राण्यांची आणि मानवाची सुटका होईल.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा