मुंबई : जगप्रसिद्ध ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ या नाटकाचे जनक डॉ. लक्ष्मण देशपांडे यांची आज जयंती. त्यानिमित्त नाटक आणि लक्ष्मण देशपांडे हे नुसते नाटककार म्हणूनच चांगले नव्हते तर एक माणूस म्हणू देखील त्यांनी आपला ठसा उमटवला होता.
लक्ष्मण देशपांडे यांचा जन्म ५डिसेंबर १९४३ रोजी झाला. त्यांचे शिक्षण एम.ए.पीएच.डी., मास्टर ऑफ ड्रॅमॅटिक्स अशा विविध पदव्या घेऊन नाटकांत कामे केली. त्यांनी प्राध्यापक म्हणूनही काम केले.
त्यांनी २३नाट्यमहोत्सवाचे आयोजन, २०० पेक्षा अधिक नाट्यकथांची निर्मिती करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच अनेक चित्रपटांमध्ये भूमिकाही केल्या.
तीन छोटे दिवे, तीन माईक आणि पंचा इतके छोटे साहित्य वापरून ५२ व्यक्तिरेखा उभ्या करणाऱ्या ‘वऱ्हाड निघालंय लंडन’ या नाटकाची सुरुवात १९८० मध्ये झाली.
लक्ष्मण देशपांडे यांना जगप्रसिद्ध केले ते ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ या एकपात्री नाटकाने. या नाटकात ५२ पात्रांचे विविध आवाज आणि कमी हालचाली हे वैशिष्ट्य होते.
लक्ष्मण देशपांडे यांच्या व्यक्तिमत्वाची दखल ‘गीनिज बुक’मध्ये दोन वेळा घेण्यात आली. विशेष म्हणजे ‘वऱ्हाड’चे लेखन, दिग्दर्शन आणि कलावंत या सगळ्या भूमिका डॉ. देशपांडे यांच्याच होत्या.
वऱ्हाडचे प्रयोग लंडन, अमेरिका, कॅनडा, दुबई, मस्कत, ऑस्टेलिया, नायजेरिया, नैरोबी, कतार, कुवेत, थायलंड, सिंगापूर या देशांतही झाले. २००९ मध्ये देशपांडे यांचे निधन झाले.
‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’ने त्यांच्या या कार्याचा १९९६ मध्ये गौरव केला. २००३ मध्ये त्यांना महाराष्ट्र शासनाने सन्मानित केले तर २००४ ला त्यांना विष्णुदास भावे पुरस्कार प्रदान करण्यात आला. याव्यतिरिक्तही त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले.
‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ या नाटकाचे आजपर्यंत ३००० च्या आसपास प्रयोग झाले आहेत. सध्या अभिनेता संदीप पाठक ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’चे प्रयोग करत आहे. देशपांडे यांच्या वेळेइतकीच या नाटकाची लोकप्रियता आजही कायम आहे.