Pune Big blow to vehicle buyers: पुणेकरांनो, तुमच्या खिशाला आता आणखी कात्री लागणार आहे! नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात वाहन खरेदीवरील करात एक टक्का वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता तुमची आवडती गाडी खरेदी करणे अधिक महाग होणार आहे. गेल्या वर्षीपर्यंत १० लाखांपर्यंतच्या चारचाकी वाहनांवर ११ टक्के खरेदी कर आकारला जात होता, तो आता १२ टक्के झाला आहे. याचा थेट परिणाम वाहन खरेदीदारांच्या खिशावर होणार आहे. पुणे प्रादेशिक परिवहन विभागात मागील वर्षी ६९ हजारांहून अधिक चारचाकी वाहनांची विक्री झाली होती, ज्यामुळे आरटीओला कोट्यवधींचा महसूल मिळाला. परंतु, आता कर वाढल्याने खरेदीदारांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.केवळ सामान्य नागरिकांनाच नाही, तर हौशी आणि श्रीमंत लोकांनाही या वाढीचा फटका बसणार आहे. कोट्यवधी रुपये किमतीच्या आलिशान गाड्या खरेदी करणाऱ्यांना आता २० टक्क्यांऐवजी ३० टक्के खरेदी कर भरावा लागेल. त्यामुळे त्यांची हौस पूर्ण करण्यासाठी अधिक पैसे खर्च करावे लागतील.
याशिवाय, राज्यातील लाइट कमर्शियल व्हेईकलवरील आरटीओ करही वाढवण्यात आला आहे. यापूर्वी हा कर वाहनाच्या वजनावर आधारित होता, परंतु आता १ एप्रिलपासून तो वाहनाच्या किमतीच्या ७ टक्के दराने आकारला जाणार आहे. यामुळे टेम्पो चालकांसारख्या सर्वसामान्य वाहन चालकांवर आर्थिक बोजा वाढणार आहे. महाराष्ट्र राज्य वाहन चालक-मालक प्रतिनिधी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बाबा शिंदे यांनी या निर्णयावर पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे.
एकंदरीत, वाहन खरेदीदारांसाठी हा अर्थसंकल्प निराशाजनक ठरला आहे. कर वाढल्याने मध्यमवर्गीय आणि श्रीमंत अशा दोन्ही स्तरांतील लोकांना गाड्या खरेदी करणे अधिक खर्चिक होणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी, सोनाली तांबे