येत्या ऑगस्ट पासून देशात १००% इथेनॉलवर धावणार वाहने, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मोठी घोषणा

दिल्ली ३० जून २०२३ : आपल्या नावीन्यपूर्ण विकासाच्या संकल्पनामुळे चर्चेत असणारे, केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी आणखी एक मोठी घोषणा केली आहे. देशात १००% इथेनॉल इंधनावर धावणारी वाहने येत्या ऑगस्ट महिन्यात लॉंच करण्यात येतील अशी घोषणा गडकरी यांनी एका मुलाखतीत केली आहे. हा निर्णय देशासाठी क्रांतीकारक ठरणार आहे. यामुळे आयात शुल्क, इंधनावरील खर्च आणि प्रदुषण कमी होणार आहे. तसेच संपूर्ण स्वदेशी तंत्रज्ञानातून इथेनॉल इंधनावरील वाहनांची निर्मिती केली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

भारतीय बाजारात सध्या इथेनॉलची किंमत ६६ रुपये प्रति लीटरच्या आसपास आहे. आणि पेट्रोलची किंमत १०८ रुपयांच्या जवळपास आहे. जर हा प्रयोग यशस्वी झाला तर भारतीय रस्त्यावर स्वस्तातील इथेनॉलवरील दुचाकी आणि चारचाकी वाहने धावताना दिसणार आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुढे म्हटले की, ऑगस्ट महिन्यात १००% इथेनॉल इंधनावरील वाहने लॉंच करण्यात येतील,
बजाज, टीव्हीएस आणि हिरो कंपन्यांनी १००% इथेनॉल इंधनावर धावणाऱ्या मोटारसायकली तयार केल्या आहेत. टोयोटा कंपनीच्या ६०% पेट्रोल आणि ४०% वीजेवर चालणाऱ्या कॅमरी कारच्या धर्तीवरील वाहने देशात लॉंच केली जातील. जी ६०% इथेनॉल आणि ४०% वीजेवर चालतील.

इथेनॉल एक प्रकारचे अल्कोहल आहे. जे स्टार्च आणि साखरचे फर्मेंटेशन तयार होते. ऊसापासून साखर तयार करताना साखर कारखान्यात इथेनॉल तयार करण्यात येते. त्यात पेट्रोल मिक्स करुन ते इको फ्रेंडली इंधनासारखे वापरले जाऊ शकते. इथेनॉल ऊसाच्या रसापासून होते. तसेच स्टार्च कॉन्टेनिंग मटेरियल्स सारखे मका, कुजवलेले बटाटे, भाजीपाला यापासून देखील इथेनॉल तयार करता येते.

१ जी इथेनॉल : फर्स्ट जनरेशन इथेनॉल ऊसाच्या रसापासून, गोड बिट, सडलेले बटाटे, गोड ज्वारी आणि मक्क्यापासून तयार होतील.२ जी इथेनॉल : सेकंड जनरेशन इथेनॉल सेल्युलोज आणि लिग्नोसेल्यूलोसिक मटेरियल उदा. तांदळाचा भूसा, गव्हाचा भूसा, कॉर्नकॉब ( भूट्टा ), बांबू आणि वुडी बायोमास पासून तयार केले जाते.
३ जी इथेनॉल : थर्ड जनरेशन बायोफ्यूअल शेवाळापासून तयार केले जाते. यावर अद्याप संशोधन सुरु आहे.

पेट्रोल-डीझल गाड्यांमुळे होणारे हवेचे प्रदुषण रोखण्यासाठी पारंपारिक इंधनाचे वाढते दर पाहून जगभरातील सरकारे इथेनॉल ब्लेंडेड फ्युअलवर काम करीत आहेत. भारतात देखील इथेनॉलला पेट्रोलला पर्याय म्हणून पाहीले जात आहे. इथेनॉलमुळे गाड्यांचे मायलेज वाढणार आहे. देशात ५%च्या इथेनॉलपासून प्रयोगाला सुरुवात झाली होती. ती आता २०%पर्यंत पोहचली आहे.

सरकारने एप्रिल महिन्यापासून नॅशनल बायो फ्युअल पॉलिसी लागू करीत ई-२० ( २०% इथेनॉल+ ८०% पेट्रोल ) पासून ते ई – ८० ( ८०% इथेनॉल + 20 टक्के पेट्रोल ) पर्यंत पोहचण्यात लक्ष्य गाठण्याची प्रक्रीया सुरु झाली आहे. देशात एप्रिलपासून केवळ फ्लेक्स फ्युएल कंप्लाईंट गाड्यांची विक्री सुरु केली आहे. जुन्या गाड्यांना इथेनॉल इंधन कम्पाएंट व्हीईकलमध्ये परिवर्तीत करण्याची योजना आहे. परंतू याकरीता अजूनही इन्फ्रास्ट्रक्चर तयार नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा