जालना, दि.१३ जून २०२० : जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यात काऱ्हाळा येथील एकनाथ बाबासाहेब सोळंके या तरुण शिक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. मयत शिक्षकाच्या पत्नीने फिर्याद दिल्याने शाळेचे मुख्याध्यापक व इतर दोन जणांविरुद्ध आष्टी पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी मी, पोलीस २०१३ पासून जालना तालुक्यातील दरेगाव येथील शहीद भगतसिंग हायस्कूलमध्ये एकनाथ सोळंके ( वय ३१) हे कार्यरत होते. ते हिंदी विषय शिकवायचे. एकनाथ सोळंके यांनी संस्थेला यापूर्वी तीन टप्यात पंधरा लाख रुपये रोख रक्कम दिली होती. परंतू शाळेतील मुख्याध्यापक व संस्थेचे इतर काही पदाधिकारी हे वारंवार पुन्हा पैशाची मागणी करत असल्याने व पैसे नाही दिल्यास शाळेतून काढून टाकण्याची धमकी देत असल्याचा आरोप मयत शिक्षकाच्या पत्नीने केला आहे. जवळपास आठ वर्षे संस्थेला पैसे देवून देखील वेतन चालू न केल्याने चिंताग्रस्त होवून हताश झाल्याने माझ्या पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
मयत एकनाथ सोळंके यांच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादी वरून शाळेचे मुख्याध्यापक वसंत घुले,आण्णा सावंत, दामोदर मानकापे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष सानप यांच्या मार्गदर्शनाखाली राजधर पठाडे हे करत आहेत.
न्युज अनकट प्रतिनिधी: