दूरदर्शनवर गाजलेली मालिका ‘नुक्कड’मध्ये ‘खोपडी’ची व्यक्तिरेखा साकारणारे ज्येष्ठ अभिनेते समीर खक्कर कालवश

मुंबई, १५ मार्च २०२३ : दूरचित्रवाणी वाहिनीवरील गाजलेली मालिका ‘नुक्कड’मध्ये खोपडी ही व्यक्तिरेखा साकारणारे ज्येष्ठ अभिनेते समीर खक्कर (वय ७१) यांचे बुधवारी (ता. १५ मार्च) निधन झाले. समीर खक्कर यांनी मुंबईच्या पश्चिम उपनगरातील बोरिवली येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.

समीर खक्कर यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले होते; पण ते ‘नुक्कड’ या टीव्ही मालिकेतील ‘खोपडी’ या भूमिकेसाठी विशेष ओळखले जायचे. समीर खक्कर तब्बल ३८ वर्षांपासून अभिनय क्षेत्रात काम करीत होते. त्यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

‘पुष्पक’, ”हेनशाह’, ‘रखवाला’, ‘दिलवाले’, ‘राजा बाबू’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये समीर खक्कर झळकले आहेत; मात्र १९९६ मध्ये त्यांनी अभिनय कारकिर्दीला राम राम ठोकून अमेरिकेत जाण्याचा निर्णय घेतला होता. अमेरिकेत ते जावा कोडर म्हणून नोकरी करीत होते. अमेरिकेत काम करीत असताना समीर आनंदी होते; पण २००८ मध्ये तिथल्या मंदीनंतर त्यांची नोकरी गेली.

समीर यांनी ‘नुक्कड’ या मालिकेतून अभिनय क्षेत्रात करिअरची सुरवात केली होती. त्यानंतर ते दूरचित्रवाणी वाहिनीवरील ‘सर्कस’ या मालिकेत चिंतामणीची भूमिका साकारताना दिसले. समीर यांनी डीडी मेट्रोच्या ‘श्रीमान श्रीमती’ या मालिकेत चित्रपट दिग्दर्शक टोटोची भूमिकाही साकारली होती.

याशिवाय ‘संजीवनी’ या मालिकेतही त्यांनी गुड्डू माथूरची भूमिका साकारली होती. याशिवाय ‘हसी तो फसी’, ‘जय हो’, ‘पटेल की पंजाबी शादी’ यांसारख्या चित्रपटात काम केले.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा