मुंबई, ११ जानेवारी २०२३: लाखाची गोष्ट, गुळाचा गणपती, देवबाप्पा, मोहित्यांची मंजुळा, बोलाविता धनी, कोर्टाची पायरी आदी चित्रपटांच्या नायिका चित्रा, म्हणजेच कुसुम नवाथे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ८९ वर्षांच्या होत्या.
मिळालेल्या माहितीनुसार, चित्रा नवाथे यांच्यावर गेल्या दीड वर्षाहून अधिक काळ मुलुंडमधल्या सरला नर्सिंग होममध्ये उपचार सुरू होते. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर सांताक्रुझ येथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.
निर्माते, दिग्दर्शक दिवंगत राजा नवाथे यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता. चित्रा व रेखा (कामत) या दोन बहिणींनी एके काळी मराठी चित्रपटसृष्टी गाजवली होती. ग. दि. माडगूळकर यांनी चित्रपटसृष्टीत कुसुम नवाथे यांचे चित्रा असे नामकरण केले होते. अलीकडच्या काळात त्यांनी ‘बोक्या सातबंडे’, ‘अगडबम’, या चित्रपटात आज्जीच्या भूमिका साकारल्या होत्या. तर वयाच्या ७८ व्या वर्षी त्यांनी टिंग्या चित्रपटात भूमिका केली होती.
चित्रा आणि राजा नवाथे यांच्या मुलाचे तरुण वयातच अपघाती निधन झाले होते तर पती राजा नवाथे यांचेही २००५ साली आजारपणाने निधन झाले.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.