कराड, १५ नोव्हेंबर २०२०: ‘लागीरं झालं जी’ या झी मराठी वाहिनीवरील मालिकेला प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिला होता. मालिकेतील जिजीचे पात्र साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री कमल ठोके यांचे शनिवारी निधन झाले आहे. ऐन दिवाळीत त्यांच्या अशा जाण्यामुळे संपूर्ण मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. मराठी कला क्षेत्रात ज्येष्ठ अभिनेत्री आणि माजी मुख्याध्यापिका श्रीमती कमल ठोके अशी त्यांची ओळख आहे.
कमल ठोके यांना कर्करोग झाला होता. १४ नोव्हेंबरला संध्याकाळी बंगळुरू इथं त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कमल ठोके यांच्यावर कराड येथिल त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्या ७४ वर्षांच्या होत्या. प्रसिद्ध मालिका लागिर झालं जी मधून कमल ठोके यांनी प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवली.
काही मराठी चित्रपटांतूनही त्यांनी अभिनय साकारला होता. १९९२ मध्ये चित्रपटसृष्टीत त्यांनी प्रवेश केला पण कराडसारख्या ठिकाणी राहून आणि शिक्षकाची नोकरी करून ते काम करणे अवघड होते. त्यामुळे सेवानिवृत्त झाल्यावर त्यांनी चित्रपट क्षेत्रात नव्याने पाऊल ठेवले. बाबा लगीन, बरड, माहेरचा आहेर, सख्खा भाऊ पक्का वैरी, आम्ही असू लाडके, ना. मुख्यमंत्री गावडे शा अनेक चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे